।। श्री शंकरगाथा ।।

57

संत’ कुळीचा राजा!!!

एकदा श्रीशंकर महाराज विमनस्क अवस्थेत अचानकपणे म्हणाले, ‘नाऱया गेला’. त्यांच्या बोलण्याचा अर्थ तिथे उपस्थित असलेल्या कुणालाही उमगला नाही मात्र, पुढे काही दिवसांनी समजले की, त्या वेळी बेट केडगावचे श्रीनारायण महाराज समाधिस्थ झाले होते.

श्रीसाईबाबा शिर्डी येथे देहरूपाने वावरत असतानाचा हा प्रसंग. वातविकाराने त्रासलेल्या एका बाईला तिच्या कुटुंबीयांनी श्रीसाईबाबांकडे नेले. आखडलेल्या पायांमुळे तिला धड चालताही येत नव्हते. ती श्रीसाईबाबांसमोर कशीबशी उभी राहिली तेव्हा बाबा म्हणाले, ‘बाई, जा. शंकरबाबाला भेट.’ साईवचनानुसार ती बाई श्रीशंकर महाराजांच्या दर्शनाला आली आणि काही दिवसांतच व्याधीमुक्त झाली.

काबुलीवालाबाबा नावाच्या सत्पुरुषाकडे श्रीमहाराज वास्तव्यास येत असत तेव्हा नागपूरचे ताजुद्दिनबाबा अवलियादेखील तेथे येत असत. श्रीमहाराज जेव्हा झोप घेत तेव्हा ताजुद्दीनबाबा पहारा करीत, मात्र त्यांचे हे वागणे काही कट्टर मुसलमानांना अजिबात पटत नसे. यावरून एकदा काही मुसलमान काठय़ा घेऊन ताजुद्दिनबाबांना मारावयास गेले असता त्यांना बाबांच्या जागी हनुमंताचे विराट रूप दिसले. हा अघटित प्रकार पाहून ती मुसलमान मंडळी घाबरली आणि पळून गेली.

एकदा हनुमान जयंतीच्या दिवशी श्रीमहाराजांनी उपस्थित भक्तांना श्रीहनुमंताच्या रूपात दर्शन दिले. या अघटित लीलेविषयी काही जिज्ञासू भक्तांनी श्रीमहाराजांना विचारले असता त्यांनी अतिशय सहजभावाने उत्तर दिले की, ‘यात फारसे काही विशेष नाही. योगसामर्थ्यामुळे हे कुणालाही सहज शक्य आहे. तुम्हांला योगसामर्थ्य अवगत नाही म्हणून तुम्ही या चमत्काराने थक्क होता.’

श्रीमहाराज सोलापूरमध्ये वास्तव्यास असत तेव्हा अमावास्येची तिथी साधून नजीकच्या वडवळ नागनाथ मंदिराला भेट देत असत. येथे श्रीनवनाथांचे मंदिर आहे. एकदा श्रीमहाराज दर्शनार्थ आले असता, काही भाविक मंडळींनी एकत्र जमून श्रीमहाराजांच्या समक्ष येथे कायमस्वरूपी उत्सव चालू व्हावा असा संकल्प व निर्धार केला. उत्सवाच्या निमित्ताने सर्वांना परमार्थाची गोडी लागावी हा त्यामागचा उद्देश होता. महाराजांनी त्यांना यथास्थित मार्गदर्शन केले अन् त्यातूनच पुढे अमावस्येच्या तिथीला श्रीनवनाथ मंदिराच्या उत्सवास प्रारंभ झाला. अशा ‘सत्य’ संकल्पाला श्रीमहाराज नेहमीच चालना देत असत आणि भक्तिमार्गाचा यथोचित पुरस्कार करीत असत.

एकेदिवशी श्रीमहाराज जेजुरीहून परतले अन् थेट वासुदेव पंडित यांच्या घरी आले. तो दिवस सोमवती अमावास्येचा होता. श्रीमहाराज आले ही बातमी कळताच पंडितांच्या घरी भक्तांची गर्दी लोटली. श्रीमहाराज आसनावर विराजमान झाले तोच तेथे विलक्षण गोष्ट घडली ती म्हणजे श्रीमहाराजांच्या जागी मोठी शिवपिंडी निर्माण झाली. भक्तांना सांबसदाशिवाचे दर्शन घडवून पुढे श्रीमहाराज पूर्वस्थितीस आले.

एकदा पुण्यातील एका स्वामीभक्त छायाचित्रकाराला खुद्द श्रीस्वामीसमर्थांनी ‘आपले छायाचित्र काढण्यासाठी औदुंबरक्षेत्री यावे’ असा स्वप्नदृष्टांत दिला आणि योग्य दिवस अन् वेळही सांगितली. त्याने ही गोष्ट त्याच्या आप्तेष्टांना सांगितली तेव्हा, श्रीस्वामींचे दर्शन घडेल या हेतूने अनेकजण त्या छायाचित्रकारासोबत औदुंबरक्षेत्री निघाले. मात्र, त्या सुमारास कृष्णा नदीला पूर आल्याने मार्ग बंद झाला आणि सर्वजण अडकून पडले. श्रीस्वामीसमर्थांनी दिलेली वेळ टळू नये म्हणून तो छायाचित्रकार सायकल घेऊन औदुंबरला पोहोचला तेव्हा, त्याला तिथे श्रीशंकर महाराज भेटले आणि, ‘अरे, मी तुला एकटय़ाला ये म्हणून सांगितले, तर तू सर्वांना घेऊन आलास? मला तू एकटा हवा होतास.’ असे म्हणत त्याला आपले छायाचित्र काढावयास सांगितले. त्याने श्रीमहाराजांच्या सांगण्यानुसार केले. त्यानंतर श्रीमहाराज त्याच्यासह रेल्वे स्थानकावर आले. ट्रेनमध्ये चढताना त्या छायाचित्रकाराने श्रीमहाराजांचा हात धरला आणि तक्षणी त्याला श्रीस्वामीसमर्थांचे ‘साक्षात’ दर्शन घडले. श्रीस्वामीसमर्थ आणि श्रीशंकर महाराज किती एकरूप होते हे सांगणारा हा बोलका प्रसंग आहे.

आपली प्रतिक्रिया द्या