समृद्ध करणारी भूमिका

>> शब्दांकन – निनाद पाटील 

आजवरच्या अभिनय कारकीर्दीमध्ये अनेक भूमिका साकारल्या. मग ते नाटक असो, सिरिअल असो, की सिनेमा. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतील शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी जेव्हा मला विचारणा झाली, तेव्हा स्वर्ग दोन बोटे उरणे या वाक्यप्रचाराचा खरा अर्थ मला कळला. मनोमनी प्रचंड आनंद झाला. तो आनंद येताना सोबत एक जबाबदारीची जाणीवदेखील घेऊन आला… सांगतोय अभिनेता शंतनू मोघे.महाराजांची वेशभूषा, रंगभूषा हे सारं ठीक, पण त्या व्यक्तिरेखेची मानसिकता समजून घेणे मोठं जिकरीचं काम होतं. या व्यक्तिरेखेचा अभ्यास करताना मला प्रचंड मेहनत करायला लागली. महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पंगोरे आहेत ते खोलवर समजून घेणं हेच एक दिव्य होतं. जोपर्यंत मी स्वतः ‘कन्व्हीन्स’ होत नाही तोपर्यंत प्रेक्षकांना ‘कन्व्हीन्स’ करणं हे अशक्य. त्यासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. या व्यक्तिरेखेने माझं आयुष्य एका वेगळय़ा अर्थाने समृध्द केलं हे मात्र खरं. माझे वडील नेहमी म्हणायचे, एक वेळ पैशांची श्रीमंती नसली तरी चालेल, पण माणसांची श्रीमंती मात्र हवी. महाराजांनी समस्त रयतेच्या मनावर अधिराज्य करून अगणित माणसं जोडली होती. माणसं हेरणं, पारखणं, त्यांची संघटना उभी करणे, त्यांना समजून घेणं, समजावून सांगत त्यांच्यात सामावून जाणं आणि त्यांना आपल्यात सामावून घेणं, हे महाराजांचं कसब विलक्षण आहे आणि म्हणूनच घराघरातील मावळे त्यांच्या एका हाकेवर प्राणांची आहुती द्यायला सज्ज होते. स्वराज्य स्थापनेचं स्वप्न जनमानसात चेतवणं आणि ध्येयापर्यंत गेल्यानंतरही ते सतत चेतवत ठेवणं हे मोठं जिकरीचं काम आणि ते महाराजांनी लीलया करून दाखवलं… ते ‘लोकनायक’ होते.एक वेळ दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल, पण माणसाने आपल्या ध्येयापासून परावृत्त व्हायचं नाही, हेसुध्दा शिकवलं या भूमिकेने. कोणताही संकल्प करायचा असेल, तर त्यासाठी दूरदृष्टी गरजेची  आहे. तिथे पोहोचण्यासाठी जे काही अडथळे येतील, त्यावर मात करण्याची मानसिक, शारीरिक आणि आर्थिक तजवीज आधीच करून ठेवणे हे महत्त्वाचे आहे. लाखों माणसांचा फौजफाटा, हत्ती व घोडे सांभाळणे, त्यांच्या अन्नपाण्याची चोख व्यवस्था करणे यासाठी किती मॅनेजमेंट स्किल्स लागली असतील याची कल्पनाही आपल्याला येणार नाही. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराजांनी आखलेल्या साऱया मोहिमा व त्याचं काटेकोर नियोजन.साधं चार माणसांच्या कुटुंबातही भांडय़ाला भांडं लागतंच, पण समस्त रयतेतील विविध स्वभावाचे, विचारसरणीचे लोक त्यांनी एका छताखाली कुटुंबप्रमुख बनून अलवारपणे बांधून ठेवले. पुष्कळशा प्रसंगांमध्ये जवळच्या माणसांनी दुखावल्यानंतरही हताश न होता, ती परिस्थिती कशी काळजीपूर्वक निभावून न्यावी, शांत संयमी राहून योग्यवेळ येईपर्यंत न थकता, न डगमगता स्वप्नपूर्तीच्या वाटेवर चालत राहायला शिकवलं ते महाराजांनी.त्यांनी कधीही स्वतःचा उदो उदो केला नाही. ‘हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा’  हे त्यांचे वाक्य आपल्याला बरेच काही शिकवून जातं.महाराजांची भूमिका साकारणं एक वेळ जमेल, पण त्यांचे  आचार- विचार अमलात आणणं हे महाकठीण आहे आणि मुख्य म्हणजे ते काही दिवसांत किंवा वर्षांत अंगीकारता येईल असं नाही, ही एक तपश्चर्या आहे. या व्यक्तिरेखेने इतपं भरभरून दिलंय की, ते मला केवळ शब्दांत मांडता येणार नाही. शेवटी इतपंच सांगेन की, ‘झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा!