
निवडणुका आल्यानंतर इंडियात काही जागांसंबंधी मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही; परंतु असे प्रश्न येतात, तेव्हा त्या राज्यात ज्यांचा इंटरेस्ट नाही, अशांना चर्चेला पाठवू आणि त्यातून मार्ग काढू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
बारामती येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. इंडिया आघाडीच्या एकजुटीबद्दल विचारले असता पवार म्हणाले, ‘चार राज्यांत सध्या निवडणुका आहेत. तिथे शक्यतो एकवाक्यता कशी करता येईल, याबाबत प्रयत्न होईल. अजून ती प्रक्रिया आम्ही सुरू केलेली नाही. मी मुंबईला गेल्यानंतर काँग्रेस व अन्य पक्षांशी चर्चा करून वाद होऊ नयेत, यासंबंधी आम्ही काळजी घेऊ. ही प्रक्रिया येत्या आठ-दहा दिवसांत होईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
कांद्यावर 40 टक्के एक्साईज डय़ुटी लावली आहे. नाशिक, धुळे, पुणे, नगर, सातारा येथील कांदा हा देशात व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जातो. त्याला पेंद्राने बंधने घातली. हे जिरायत शेतकऱ्यांचे पीक आहे. त्यावर बंधने घालणे, कर लावणे हे अन्यायकारक आहे. एक्साईज डय़ुटी काढावी, असा आमचा आग्रह आहे. पीयूष गोयल यांच्यासोबत मुंबईत बैठक झाली, असे मला समजले. त्यांनी दिल्लीत बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत काही घडले, तर आनंदाची गोष्ट आहे, अन्यथा शेतकऱ्यांमधील अस्वस्थता थांबवता येणार नाही.
आरक्षणाबाबत सरकारने शब्द पाळावा
आरक्षणाबाबत राज्यात विविध समाजांकडून सुरू असलेल्या आंदोलनाबाबत ते म्हणाले, ‘आरक्षणाच्या मागणीसाठी काही लोक उपोषण, धरणे आंदोलन करीत आहेत. राज्य सरकारने त्यांना काही मुदत दिली आहे. तसेच इतक्या दिवसांत हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन दिले आहे. आमचा वाटा कमी करू नये, अशी ओबीसींची अपेक्षा आहे. त्याची नोंद सरकारला घ्यावी लागेल. त्याबाबत योग्य ती काळजी घेऊ, असा विश्वास राज्य सरकारने दिलेला आहे, असे माझ्या वाचनात आले.’




























































