Rajya Sabha Election 2022 – धक्का बसेल असा हा निकाल नाही! भाजपचा रडीचा खेळ!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यसभा निवडणुकीचा निकाल हा धक्का बसेल असा निकाल नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपचे प्रत्येकी 3 उमेदवार विजयी झाले आहेत. शुक्रवारी झालेल्या मतदानानंतर मतमोजणीला बराच विलंब झाला होता. शनिवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास या निवडणुकीचा निकाल लागला. सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडीक यांच्या लढत झाली होती. यामध्ये भाजपचे धनंजय महाडीक हे विजयी झाले आहेत.

महाविकास आघाडीची तीन मते अवैध असल्याने ती बाद ठरवावीत, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयागोकडे केली होती. ती मते वैध असल्याचा निर्वाळा देत मतमोजणी करण्यात यावी असा आदेश आयोगाने दिला होता, ज्यामुळे उशिराने मतमोजणीला सुरुवात झाली. हा सगळा प्रकार म्हणजे भाजपचा रडीचा खेळ होता अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. राज्यसभा निवडणुकीच्या नियमानुसार आमदारांनी त्यांचे मत नेतृत्वाला दाखवले होते, त्यात बेकायदेशीर काहीही नाही असे पवार यांनी म्हटले.

राज्यसभा निवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना पवार म्हणाले की, मला स्वत:ला फार धक्का बसेल असा हा निकाल नाही. तुम्ही मतांची संख्या बघितली प्रत्येक उमेदवाराची तर राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना आणि काँग्रेस यांच्या उमेदवारांना जो कोटा दिला त्या कोट्यामध्ये काहीही फरक पडला नाही. फक्त एक मत प्रफुल्ल पटेल यांना ज्यादा पडले, ते कुठून आलंय हे मला माहिती आहे. ते आघाडीचं नाही ते दुसऱ्या बाजूने आलं आहे.

शिवसेनेने सहावी जागा लढवण्याचे धाडस केले. त्यांच्याकडे मतांची संख्या कमी असूनही त्यांनी प्रयत्न केला. अपक्षांची संख्या भाजपकडे जास्त असली तरी ती मविआ आणि भाजप दोघांसाठी पुरेशी नव्हती असे पवार म्हणाले. महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी भाजपने प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यश मिळालं ज्यामुळे हा फरक पडला असं मत पवार यांनी नोंदवलं आहे. जो चमत्कार झालाय तो पाहता मान्य केलं पाहीजे की फडणवीस यांना विविध मार्गाने माणसं आपलीशी करण्यात यश आलंय असे पवार म्हणाले.

राजकारणात रिस्क घ्यावी लागते

शरद पवार यांनी या निवडणुकीबाबत बोलताना म्हटले की अतिशय कमी मते असतानाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहावी जागा लढवली. सहाव्या उमेदवारासाठी त्यांनी मतांची संख्या ही 33-34 पर्यंत आणली. राजकारणात रिस्क घ्यावी लागते आणि ती उद्धव ठाकरे यांनी घेतली असे पवार म्हणाले.

विरोधकांसोबत असलेल्या अपक्षांचे एक मत फुटले ?

विरोधकांकडे असलेलं एक मत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना मिळाल्याचे पवार यांनी सांगितले. ज्याने हे मत दिले त्याने ते सांगून दिल्याचं ते म्हणाले. हे अधिकचं मत हे शिवसेनेला जाणार नव्हतं, ते अधिकचं मत विरोधकांच्या कोट्यातलं होतं जे राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्याचे पवार यांनी सांगितले.