
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या भाषणावरील आभार प्रस्तावावर भाषण केलं. यावेळी त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका केली. तसेच विरोधकांवरही निशाणा साधला. नेहरूंवर केलेल्या टीकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष -शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधानांनी देशाच्या दिवंगत माजी पंतप्रधानांविषयी अशा पद्धतीने बोलायला नको होतं, असं शरद पवार म्हणाले आहेत.
”पंतप्रधानांचं भाषण ऐकून मला फार दुख झालं. ते कोण्या एका पक्षाचे नाही तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहे. त्यांनी ज्या प्रकारे आज नेहरूंवर टीका केली ते चुकीचे आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्यांपैकी तसेच आपल्या आयुष्याचा मोठा काळ तुरुंगात घालवाऱ्यांपैकी ते एक होते. त्यांनी देशासाठी मोठे काम केलेले आहे. त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. देशाला लोकशाहीकडे नेण्याचे मोठं काम त्यांनी केले आहे. आज देशाात जी लोकशाही आहे ती त्यांच्यामुळेच आहे, असे शरद पवार म्हणाले.
राजकारणात वेगेवगेळ्या विचारधारा असतात. पण देशासाठी नेहरुंनी केलेले काम आपण विसरू शकत नाही. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी यांनी देशासाठी काही ना काही चांगलं काम केलं आहे. याकडे आपण लक्ष द्यायला हवं”, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.”नेहरुंच्या कामाकडे पंतप्रधान दुर्लक्ष करत आहेत. मोदींनी चुकीच्या मार्गाचा स्वीकार केला आहे. पण मला विश्वास आहे, की इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडणाऱ्या विचारसरणीला नवीन पिढी दूर ठेवेल”, अशा शब्दांत शरद पवारांनी मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

























































