
सामना प्रतिनिधी, नगर
महापौर निवडणुकीत भाजपाबरोबर जाऊ नये असे स्पष्ट आदेश मी येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि नगरसेवकांना दिले होते. पण ते पाळले नाहीत. त्यामुळे आता आम्ही बघ्याची भूमिका घेणार नाही तर भाजपसोबत गेलेल्या त्या नगरसेवकांवर आणि पदाधिकाऱयांवर चार-पाच दिवसांत निश्चित कारवाई करणार अशी ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिली. मात्र काय कारवाई करणार ते आताच कसे सांगणार असा प्रतिसवालही त्यांनी पत्रकारांना केला.
नगरमधील एका संस्थेच्या कार्यक्रमासाठी पवार नगरमध्ये आले होते. कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सध्या भाजपची अवस्था पाहता भाजप सरकार कायदा हातात घेऊन लोकशाहीचे मूल्य मोडीत काढत आहे. त्यामुळे आम्ही भाजपबरोबर जाणार नाही अशी भूमिका घेतली होती. तसेच कोणत्याही स्थितीत त्यांच्यासमवेत जाऊ नका असे स्पष्ट आदेश मी स्वतः दिले होते, मात्र स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे नगरसेवकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांच्याकडून लेखी खुलासा मागवला आहे, असे पवार यांनी सांगितले.
यापूर्वीही स्थानिक पातळीवर अशा आघाडय़ा झाल्या आहेत त्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता पवार म्हणाले, त्या आघाडय़ा पंचायत समित्यांमध्ये वगैरे झाल्या असतील, पण आता निवडणुकीच्या तोंडावर अशी कोणतीही आघाडी चालणार नाही हीच आमच्या पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे नगर येथे झालेला आघाडीचा प्रकार योग्य नाही, असे ते म्हणाले.



























































