कोश्यारींनी सर्व मर्यादा ओलांडल्या! शरद पवार यांची तीव्र नाराजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यपाल ही एक संस्था आहे. त्या संस्थेची प्रतिष्ठा ठेवायची म्हणून त्यावर आतापर्यंत कोणी बोलले नाही. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी केलेला उल्लेख पाहिल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आता पार मर्यादा ओलांडल्या आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे वक्तव्य, महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न, शेतकऱयांचे प्रश्न, गुजरात निवडणूक अशा विविध विषयांवर परखड भाष्य केले. शेतकऱयांच्या प्रश्नावरही यावेळी पवारांनी चिंता व्यक्त केली.

गैरसमज वाढवण्याचे मिशन

कोश्यारी राज्यात आल्यापासून अनेक गोष्टींवर वादग्रस्त विधान करण्याचा त्यांचा लौकिक आहे. चुकीची विधाने करून समाजात गैरसमज वाढेल कसा याची खबरदारी घेणे हेच मिशन राज्यपालांचे आहे का, असा सवाल त्यांनी केला.

स्मरणशक्ती नसलेली व्यक्ती राज्यात

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेला उल्लेख या सगळय़ा गोष्टी हेच सांगतात या पदावर बसलेल्या व्यक्तीने जबाबदारीने भूमिका घ्यायची असते, पण यत्किचिंतही स्मरण नसलेली व्यक्ती आज महाराष्ट्रात पाठवलेली आहे.

हे शहाणपणाचे लक्षण नाही

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर दावा केला आहे; परंतु आम्ही बरीच वर्षे बेळगाव, कारवार, निपाणी यासह इतर गावे मागत आहोत. त्यामध्ये आमचे सातत्य आहे. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील काही गावे मागत आहेत; परंतु बेळगाव, कारवार, निपाणीसह ते सोडणार असतील तर त्यांना काय देता येईल यावर चर्चा होऊ शकते. मात्र काही न करता कशाचीही मागणी करणे हे शहाणपणाचे लक्षण नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुनावले आहे.

गुजरात स्थिती चिंताजनक वाटते

दुसऱया राज्यात निवडणूक म्हणून आपल्या राज्यात सुट्टी देण्याचा प्रघात यापूर्वी 50-55 वर्षांत ऐकला नाही. गुजरातमधील स्थिती चिंताजनक वाटते की काय अशी शंका येणारी स्थिती आहे, असेही शरद पवार म्हणाले.

राष्ट्रपतींनी राज्यपालांचा निकाल करावा

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केल्यानंतर काल त्यांचे कौतुक करणारे विधान केले, पण हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. त्यामुळे राष्ट्रपती, पंतप्रधानांनी त्यांचा निकाल घेतला पाहिजे आणि अशा प्रकारच्या व्यक्तीकडे जबाबदारी देणे योग्य नाही, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी व्यक्त केले.