
सामना ऑनलाईन । मुंबई
पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हिंदुस्थानने पाकिस्तानच्या बालाकोट येथील ‘जैश-ए-मोहम्मद’च्या अतिरेकी तळांवर केलेले एअर स्ट्राईक आपल्या सल्ल्यानुसारच केल्याच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी घूमजाव केले आहे. प्रसारमाध्यमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. असा कोणताही सल्ला आपण दिला नव्हता. बालाकोट हल्ल्यासाठी सर्वपक्षीयांनीच संमती दिली होती, असे स्पष्टीकरण शरद पवार यांच्याकडून आज करण्यात आले आहे.
काय म्हणाले होते पवार
मावळ लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांची रविवारी जाहीर सभा झाली. या सभेत पवार यांनी मोदी सरकारवर टीका करतानाच पुलवामा हल्ल्यानंतर 13 दिवसांनी म्हणजे 26 फेब्रुवारी रोजी हिंदुस्थानी हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटमधील ‘जैश’च्या अतिरेकी तळावर एअर स्ट्राईक केला. हा एअर स्ट्राईक करण्यापूर्वी सरकारच्या वतीने आपल्याशी सल्लामसलत केली. त्यानंतरच एअर स्ट्राईक करण्यात आल्याचा शरद पवार यांनी दावा केला होता. पवारांच्या या वक्तव्याचे सोमवारी राजकीय वर्तुळात संतप्त पडसाद उमटले.
प्रसिद्धीपत्रकात काय?
पुलवामा घटनेनंतर केंद्र सरकारने दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत हिंदुस्थानी सैन्य दलाच्या पाठीशी राहण्याचा ठराव एकमताने संमत झाला. त्यात माझाही सहभाग होता, असे शरद पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. हिंदुस्थानी सैन्याचा सर्वांना अभिमान आहे असेही पवार म्हणाले.
किती अतिरेकी ठार झाले याची चर्चा नको
हिंदुस्थानी लष्कराचे सामर्थ्य जगाला ठाऊक आहे. 1965 आणि 1971च्या हिंदुस्थान-पाक युद्धात व नंतर कारगिल युद्धात त्याची प्रचीती आली आहे. त्यामुळे पुलवामा घटनेनंतर हिंदुस्थानी हवाई दलाने पाकव्याप्त कश्मीरमधील अतिरेक्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती अतिरेकी ठार झाले याची चर्चा व्हायला नको. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संरक्षणविषयक कारवाईचे राजकारण होऊ नये.


























































