
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
आर्थिक उत्पन्न कमी दाखवणे आणि कंपनीच्या पैशाचा वैयक्तिक कामांसाठी वापर केल्याप्रकरणी निसानचे संचालक कार्लोस घोसन यांना अटक झाल्यानंतर आज निसान आणि मित्सुबिशी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले. टोकियोतील तपास अधिकाऱ्यांनी घोसन यांना अटक केली होती. त्यांच्यावर लावलेले आरोप खरे असून लवकरच त्यांची हकालपट्टी करण्यात येईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. निसानचे अध्यक्ष ग्रेग कॅली यांचीही चौकशी सुरू आहे. मात्र, त्याबद्दल माहिती देण्यात तपास अधिकाऱ्यांनी नकार दिला.
100 मिलीयन येनपेक्षा अधिक पगार असणाऱ्या अधिकाऱ्यांना आपल्या मानधनाबाबत माहिती जाहीर करणे अनिवार्य आहे.
घोसन यांनी 5 बिलियनपेक्षा कमी उत्पन्न दाखवून स्वतःसाठी आलिशान घरे घेण्यासाठी कंपनीचे पैसे वापरल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ब्राझील, लेबनॉन, फ्रान्स, नेदरलॅण्ड या देशांत घरे विकत घेणे आणि घरांचे नूतनीकरण यासाठी हा पैसा वापरल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी घोसन यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.कॉर्पोरेट गर्व्हनन्सचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील घोटाळे शोधण्यासाठी जपानने नवा कायदा केला आहे. त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
कार्लोस घोसन यांची कारकीर्द
2001 मध्ये घोसन हे निसान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. त्याचबरोबर ते फ्रान्समधील रेनॉल्ट या कार कंपनीचे अध्यक्ष आहेत. डबघाईला आलेल्या निसान कंपनीला तारण्याचे श्रेय त्यांना जाते.

























































