शशिकांत अणावकर यांना मरणोत्तर समाजगौरव पुरस्कार, नाईक मराठा मंडळाचे स्नेहसंमेलन उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाईक मराठा मंडळ, मुंबईच्या वतीने देण्यात येणारा मधुकर नारायण ऊर्फ बाबा आचरेकर स्मृती समाजगौरव पुरस्कार (मरणोत्तर) वेताळबांबर्डे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष स्वर्गीय शशिकांत ऊर्फ दादा अणावकर यांना देण्यात आला. हा पुरस्कार जिंदाल स्टील समूहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष, उद्योजक पुष्कराज कोले यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. अणावकर यांचे चिरंजीव व संस्थेचे संचालक डॉ. गुरुप्रसाद अणावकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात नाईक मराठा मंडळाचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी समारंभाचे प्रमुख पाहुणे पुष्कराज कोले, गोव्यातील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गजानन मांद्रेकर यांच्यासह वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ गावडे, केळुसचे सरपंच योगेश शेटये, सुनील सांगेलकर, संयुक्त कार्यवाह किरण नाईक, खजिनदार विजय अणावकर, सरकार्यवाह न्हानू नाईक आदी उपस्थित होते. यावेळी मंडळाच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, निराधार महिलांना मदत आणि गरजूंना शस्त्रक्रियेसाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले.