
19 व्या सीआयएससीई या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत ठाण्याच्या युनिव्हर्सल शाळेच्या शौर्या अंबुरे हिने चमकदार कामगिरी केली. अडथळा धावणे स्पर्धेत आपलाच पूर्वीचा रेकॉर्ड मोडून शौर्याने नवा रेकॉर्ड प्रस्थापित करत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. त्याचबरोबर 100 मीटर धावणे स्पर्धेत शौर्याने रौप्य पदक पटकावले.
19 व्या सीआयएससीई राज्यस्तरीय विभागीय ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा मुंबईच्या प्रियदर्शिनी पार्क येथे 16 व 18 ऑक्टोबर रोजी मोठय़ा उत्साहात पार पडल्या. राज्यातील विविध शाळांमधील विभागीय स्तरावर पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ठाण्यातील पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे तसेच नवी मुंबईच्या पोलीस उपायुक्त रूपाली अंबुरे यांची कन्या आणि ठाण्याच्या युनिव्हर्सल शाळेची विद्यार्थिनी शौर्या अंबुरे हिने 80 मीटर अडथळा शर्यतीत (14 वर्षांखालील) तिचा 15.98 सेकंद हा मीट रेकॉर्ड मोडून यावेळी 14.7 सेकंद असा नवा रेकॉर्ड प्रस्थापित करून सुवर्ण कामगिरी केली. तर 2600 ऍथलीट्सनी सहभाग घेतलेल्या 100 मीटर धावणे स्पर्धेत सुवर्ण पदकाने शौर्याला थोडक्यासाठी हुलकावणी दिली. परिणामी शौर्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या चमकदार कामगिरीनंतर येत्या 4 ते 6 नोव्हेंबर रोजी पुण्याच्या बालेवाडी येथे होणाऱया देशपातळीवरील स्पर्धेत शौर्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. ठाण्याच्या एम. ऍकॅडमी येथे शौर्या सराव करत असून अजित कुलकर्णी हे तिचे प्रशिक्षक आहेत.




























































