शीना बोरा प्रकरणात खळबळजनक ट्विस्ट, पुरावे म्हणून सादर केलेले अवशेष गायब

2015 साली उजेडात आलेलं हाय प्रोफाईल शीना बोरा प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण, या प्रकरणातील एक महत्त्वाचा पुरावा असलेले अवशेष गायब झाले आहेत. सरकारी वकिलांनी ही माहिती सीबीआय विशेष न्यायालयात दिली आहे. सीबीआयने जे हाडांचे अवशेष शीना हिचेच असल्याचा दावा केला होता, ते अवशेष गायब असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या गायब झालेल्या पुराव्यांमध्ये 2012 साली पेण पोलिसांना सापडलेल्या मानवी सापळ्याचा समावेश आहे. याच वर्षी शीना हिची हत्या झाल्याचा आरोप आहे. सरकारी वकील असलेल्या सी. जे. नंदोडे यांनी विशेष सीबीआय न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, न्यायवैद्यकीय तपासणीसाठी ही हाडं अतिशय महत्त्वाची होती. मात्र, ही सध्या गायब आहेत. हा सर्व प्रकार जेजे रुग्णालयातील न्यायवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. जेबा खान यांच्या जबानीवेळी उघड झाला.

डॉ. खान यांनीच जेजे रुग्णालयात या अवशेषांची प्राथमिक तपासणी केली होती आणि हे मानवी अवशेष असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र हे अवशेष आता गायब झाले आहेत, अशी माहिती दिल्याने या प्रकरणात आता खळबळजनक ट्विस्ट आला आहे.