
कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचे कारण पुढे करीत शेल इंडिया कंपनीने अवघ्या आठवडाभरात डिझेलच्या किमतीत कमीत कमी 20 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलच्या एका लिटरसाठी 130 रुपये, तर पेट्रोलसाठी 118 रुपये किंमत मोजावी लागत आहे.
दक्षिण आणि पश्चिम हिंदुस्थानात प्रामुख्याने असलेल्या शेल इंडिया कंपनीच्या या दरवाढीनंतर पेट्रोल पंपावरील डिझेलची किंमत 130 रुपये प्रतिलिटर, तर चेन्नईत 129 रुपये प्रतिलिटर झाली आहे. शेलच्या पेट्रोल पंपावर पेट्रोलची किंमत 117 ते 118 रुपये प्रतिलिटर झाली आहे. शेलचे देशभरात 346 पेट्रोल पंप आहेत.
सरकारी पेट्रोलियम पंपन्यांच्या पेट्रोल पंपावर मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये, तर चेन्नईत 102.63 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाल्यानंतर ग्राहकांना त्रास होतो हे आम्ही समजू शकतो, परंतु बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढउतारामुळे डिझेलच्या किमतीत वाढ करणे गरजेचे होते, असे शेल इंडिया पंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.


























































