
राज्यातील शेतकऱ्यांना पावसानं झोडपलं असून प्रचंड नुकसान झेलावं लागत आहे. मात्र शिंदे-फडणवीस सरकार मदतीसाठी हालचाल करताना दिसत नाही. अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतपीके वाया गेली आहेत, हे सरकारला दिसत नाही का? दिवाळीच्या तोंडावर सरकार शेतकऱ्यांना मदतीचा हात देईल अशी अपेक्षा होती. परंतु शिंदे- फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्याबाबतीत असंवेदनशील व शेतकरीविरोधी असल्याने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही, असा निशाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी साधला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय अपेक्षित होते. अडचणीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना राज्य सरकार तात्काळ मदत देऊन दिवाळी गोड करेल अशी अपेक्षा होती परंतु शिंदे-फडणवीस सरकार हे शेतकरी हिताच्या केवळ पोकळ गप्पा मारत आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी काँग्रेसह इतर पक्षांनीही केलेली आहे परंतु या सरकारला शेतकऱ्यांचे नुकसान, शेतकऱ्यांचे दुःख, त्याचे अश्रू दिसतच नाहीत, असे नाना पटोले म्हणाले.
गुजरातच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या ईडी सरकारने राज्यातील बळीराजाला वाऱ्यावर सोडून शेतकऱ्यांची दिवाळी अंधःकारमय केली आहे, असा हल्लाबोल करत नाना पटोले यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली.
शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या घोषणा या महाविकास आघाडी सरकारने घेतलेलेच निर्णय आहेत, त्यात नवीन काय आहे?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.






























































