पोच

>> शिरीष कणेकर

‘पोच’ म्हणजे नेमकं काय? बहुसंख्य माणसांना नसतो तो पोच. तरी पोच कशाला म्हणतात? हा प्रश्न कायम राहतोच. परिणामांची तमा न बाळगता पचकणं म्हणजे पोच नसणे!

तुमच्या आसपास अशी माणसं काँग्रेस गवताप्रमाणे फोफावलेली आढळतील. वर ती स्वतःला बुद्धिमान समजतात हे वेगळं सांगायला नको. त्यात वाक्चातुर्य आलंच. आपण मूर्ख आहोत हे त्यांना कळलं तर किती धक्का बसेल नाही? त्यांना हे कळू द्यायचं नसतं व मूर्खासारखं बोलू द्यायचं असतं.
अतिशहाणपणापायी पचकलेल्या एका मुलाची – त्याला गोटय़ा म्हणूया – कल्पित कहाणी सांगतो. कोणाला तरी मुलगा झाला. त्याला दोन्ही कान नव्हते. गोटय़ाचं कुटुंब मुलाला बघायला निघाले. बाबांनी गोटय़ाला समजून सांगितले, ‘‘हे बघ गोटय़ा, बाळाला दुर्दैवानं कान नाहीत त्याबद्दल तू काही बोललास तर याद राख. मी तुला फोडून काढीन.’’
गोटय़ा म्हणाला, ‘‘डोंट वरी, बाबा.’
बाळाला बघून गोटय़ा म्हणाला, ‘काय सुंदर लाल, गुलाबी कांती आहे बाळाची! कपाळही मोठं आहे अन् नाक इवलंसं, डोळे किती छान आहेत!’’
‘‘हो, 20-20 साइट आहे त्याची.’’ बाळाची आई सुखावून म्हणाली.
‘‘हे एक चांगलं झालं.’’ गोटय़ा म्हणाला, ‘‘त्याच्या डोळय़ांना नंबर आला असता तर तो चष्मा कसा लावू शकला असता?’’
बाळाच्या आईचा आधीचा सगळा आनंद धुळीला मिळाला. घरी गेल्यावर गोटय़ाला नेमकं कसं झोडावं हे बापाला कळेना. गोटय़ा मात्र आपल्या चतूर बोलण्यावर खुश होता.
नवीन लग्न झालेल्या एकाकडे त्याचा मित्र गेला. नववधूनं हौसेनं नवऱयाच्या मित्रासाठी कांदेपोहे केले. ते खाऊन मित्र म्हणाला, ‘‘काय सुंदर पोहे केलेत! वहिनी झकास! मी आणखी एक प्लेट खाणार. त्यानं त्याच्या आधीच्या प्रेयसीशी लग्न केलं असतं तर एवढय़ा सुग्रास अन्नाला मुकला असता. नशीब काढलंस लेका.’’
मित्राच्या मते तो त्याच्या वहिनीची निर्भेळ स्तुती करीत होता. खाल्ल्या कांदेपोहय़ांना जागत होता. बोलता बोलता आपण मित्राचे काय वांधे करून ठेवलेत, त्याच्या गावीही नव्हतं. पुढे कधीही बायकोनं कांदेपोहे केले की, नवरा बायकोपासून नजर चोरायचा.
बायकांच्या ‘किटी’ पार्टीत एकीनं नवीन घेतलेली साडी दाखवली.
‘‘अय्या!’’ एक महिला चित्कारली, ‘‘मलाही डिट्टो अशी साडी प्रेझेंट आली होती. मी सरळ मोलकरणीला देऊन टाकली, पण आजकालच्या मोलकरणींचा ताण बघा. ती पण ती साडी नेसत नाही. तिनं कोणाला दिली असेल?’’
नवीन साडी कौतुकानं दाखवणाऱया बाईचा वाक्यावाक्याला कचरा होत होता. चेहरा पडत होता. जिच्या हातून आगळीक घडली होती ती पूर्णपणे अनभिज्ञ होती. करून सवरून नामानिराळं राहणं हे या पोचरहित माणसांचं निलाजरं वैशिष्टय़ आहे. तुम्ही तिला सांगायला गेला असतात तर तीच उसळून म्हणाली असती, ‘‘मी काय केलं? मी माझ्या साडीविषयी बोलत होते. तिला आणि तुम्हालाही लागण्यासारखं त्यात काय होतं?’’
एका घरात सुताराकडून टीपॉय बनवून घेण्यात आलं. घरातील वजनदार (जाडय़ापेक्षा हे बरं वाटतं, नाही?) बाईला त्या टीपॉयच्या मजबुतीविषयी शंका होती.
‘‘वजनानं ते तुटणारं नाही ना?’’ बाई परत परत विचारत होती.
‘‘नाही हो’’ त्याच त्याच प्रश्नानं उत्तर देऊन वैतागलेला सुतार म्हणाला, ‘‘नाहीतर असं करा ना, तुम्ही स्वतःच त्यावर बसून बघा. बसा-बसा, काही होत नाही. तुमच्यापेक्षा वजनदार घरात दुसरं काही असेल तर ते टीपॉयवर ठेवून बघा. जाम काही होणार नाही, पण तुमच्यापेक्षा वजनदार काहीच असणार नाही. बसता का?’’
बाईला मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. कुठून हा मजबुतीचा विषय काढला असं तिला झालं. टीपॉयची दोन तुकडे झाले असते तरी तिला चाललं असतं, पण ट्रायलसाठी तिला तिचा उपयोग व्हायला नको होता. सुताराचा बिचाऱयाचा खरंच काही वाईट हेतू नव्हता, पण लठ्ठ बायका स्वतःच्या वजनाबाबत किती संवेदनशील असतात ते सुताराला काय माहीत…?
आता माझा स्वतःचा एक क्लेशदायक अनुभव सांगतो. पोच नसलेल्या एका बाईमुळे मला झालेल्या यातना व प्रचंड मनस्ताप यांची ही दुःखद कहाणी आहे. त्या काळी मी मुलुंडला एका कंपनीत ‘कॉस्टिंग’चा ट्रेनी होतो. दुपारी मला कंपनीत फोन आला. फोनवरचा अनोळखी आवाज म्हणाला, ‘‘तुझे वडील सीरियस आहेत. लगेच निघून ये.’’
सीरियस? सकाळी निघालो तेव्हा उत्तम होते. माझी चेष्टा-मस्करी करीत होते. मी भांबावून गेलो. ट्रेनला गर्दी नव्हती. माझ्यासमोर बसलेल्या माणसाने मोठय़ानं ट्रॉन्झिस्टर लावला होता – ‘बहारों फूल बरसाओ’. माझं डोकं गरगरत होतं.
आमच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये आजी-आजोबा खुर्ची टाकून थिजल्यासारखे बसले होते. ‘‘बघ रे बाबा हॉस्पिटलला जाऊन काय झालंय ते.’’ आजी म्हणाली.
मी निघालो. पलीकडे राहणारी एक बाई ‘‘मी पण येते’’ म्हणाली. तिला नको म्हणण्याचं मला भान नव्हतं. टॅक्सी जेजेच्या दिशेनं धावत होती. वाटेत ती बाई सतत काहीतरी बोलत होती. मला ऐकू येत नव्हतं. मध्येच तिचं एक वाक्य अणकुचीदार दाभणासारखं माझ्या कानात घुसलं. ती म्हणत होती – ‘‘आम्हाला तर कळलं की, ते ऑलरेडी गेलेत.’’ माझ्या काळजाचा ठोका चुकला. तोंडाला कोरड पडली. इकडे टॅक्सी जेजेच्या पुढे निघून गेली होती. एकाएकी भानावर येऊन मी टॅक्सीवाल्याला मागे फिरायला सांगितलं. तो शिव्या द्यायला लागला. मी गयावया करून त्याच्या विनवण्या केल्या व त्याला ‘यू टर्न’ घ्यायला लावलं.
आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो. अण्णांच्या खोलीत डॉक्टरांची गर्दी होती. मला शेजारच्या खोलीत थांबायला सांगितलं. मी एखाद्या झोंबीसारखा उभा होतो. तेवढय़ात माझ्या कानावर शब्द पडले – ‘‘ही इज डेड!’’
15 मार्च 1966. पन्नास वर्षे झाली या गोष्टीला. आजही जेजेवरून जाण्याचं मी शक्यतो टाळतो, पण जावं लागलंच तर माझे हात तसेच गार पडतात. माझ्या तोंडाला तशीच कोरड पडते. मी नव्यानं सगळं जगतो. मी नव्यानं पुन्हा मरतो. माझं मढं ओढत टॅक्सी पुढे जाते. आता टॅक्सीवाल्याशी हुज्जत नाही. त्याला ‘यू टर्न’ घ्यायला सांगणे नाही. माझ्या कानात मात्र ट्रान्झिस्टरवरचं गाणं घुमत असतं – ‘बहारो फूल बरसाओ, मेरा मेहबूब आया है… आम्हाला तर कळलं ते ऑलरेडी गेलेत… ही इज डेड… ही इज डेड… ही इज डेड…!

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या