मोठय़ांच्या छोटय़ा गोष्टी – 5

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
डॉ. काशिनाथ घाणेकर - अभिनेते डॉ. घाणेकर हे दंत शल्यविशारद म्हणजेच Dental Surgeon म्हणून प्रॅक्टिस करत होते.

>> शिरीष कणेकर

परवा एका वाचकानं माझ्याकडे माझा आणि डॉक्टरांचा पह्टो मागितला. ‘‘कोण डॉक्टर?’’ मी बुचकळय़ात पडून विचारलं, ‘‘डॉ. काशीनाथ घाणेकर’’ पलीकडून उत्तर आलं.

माय गॉड! म्हणजे मी चक्क डॉक्टरांना विसरलो की काय? ते असते तर वेळी अवेळी (जास्त करून अवेळीच!) पह्न करून डाफरले असते, ‘‘माजला काय भाडखाऊ? मला विसरतोस, मला? या डॉक्टर काशीनाथ घाणेकरला!’’

नेहमीप्रमाणेच मी निरुत्तर झालो असतो. शिव्यांत गुंफलेल्या प्रेमाच्या रज्जूंनी त्यांनी मला जखडून ठेवलं होतं. मी भाग्यवान. हा पेटता निखारा मला लाभला होता. एकदा तर प्रभाकरपंत पणशीकरांनी मला बोलावून अजीजीच्या सुरात सांगितले होते, ‘‘जरा डॉक्टरला समजाव रे.’’
मी? मी या आग्यावेताळाचं गरीब कोकरू करणार? डॉक्टरांना मी जवळचा वाटतो ही कविकल्पना नाटय़सृष्टीतही पसरली असावी. एकदा माझी सासू त्यांच्या नाटकाला गेली होती. मी डॉक्टरांना चिठ्ठी दिली. त्यात लिहिलं होतं- ‘‘माझ्या सासूच्या मते मी दारू पीत नाही ही एकमेव गोष्ट माझ्यात चांगली आहे. माझी ‘इमेज’ टिकवण्यासाठी व उंचावण्यासाठी तिला चांगली सीट द्यावी.’
डॉक्टरांनी तिला पहिल्या रांगेत बसवलं व ज्याला त्याला ती चिठ्ठी दाखवून ते खिदळत होते, असे त्या नाटकातीलच कलाकारांनी मला नंतर सांगितले.
एकदा माझ्या सासूची मुलगी डॉक्टरांच्या ‘मला उत्तर हवंय’ या नाटकाला शिवाजी मंदिरला जाणार होती. सकाळीच डॉक्टरांचा मला पह्न आला, ‘अरे, आज पाठवू नकोस बायकोला नाटकाला. सुधा करमरकरला अपघात झालाय व तिचा पाय मोडलाय. प्रयोग रद्द झालाय. तिला उगीच चक्कर पडेल म्हणून पह्न केला.’
डॉक्टर एवढी काळजी घेतात हा अगदीच वेगळा अनुभव होता.
‘गुंतता हृदय हे’ या नाटकात डॉक्टर व आशा काळे यांचा एक गाजलेला प्रसंग होता. त्यात असे संवाद होते-
डॉक्टर ः एवढी बोलणी पाठवूनही मी आलो नाही याचा अर्थ नाही कळला?
आशा काळे ः अर्थ कळूनही बोलावत राहिले याचा अर्थ नाही कळला?
या वाक्यावर प्रेक्षकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद यायचा. एका प्रयोगाला डॉक्टर अडून बसले. माझ्या आधीच्या वाक्यामुळे तिच्या वाक्याला प्रतिसाद येतो. आज मी बोलणारच नाही. बघू मग ती काय बोलते! बावापुता करून त्यांना राजी करण्यात आले व प्रयोग सुरळीत झाला.
एकदा डॉक्टरांनी जेमतेम फर्लांगावर राहणाऱया विश्राम बेडेकरांना फोन लावला.
‘‘तुमचा फोन ठेवला की, मी बाल्कनीतून उडी मारून जीव देणार आहे’’ डॉक्टर म्हणाले.
‘‘ठीक आहे. सकाळी फोनवर बोलू.’’ बेडेकर शांतपणे म्हणाले.
थोडक्यात, बेडेकर डॉक्टरांना किती ओळखून होते बघा.
माझ्या ‘यादों की बारात’च्या प्रकाशनाला डॉक्टर आवर्जून उपस्थित होते. पुस्तकाची पहिली प्रत त्यांनी विकत घेतली. हे पुरेसं नव्हतं म्हणून की काय, त्यांनी आणखी चौसष्ट प्रति खरीदल्या. त्या मित्रपरिवारात वाटल्या. मग ते उत्साहात मला म्हणाले, “चल, आपण गावोगावी पुस्तक-प्रकाशनाचा कार्यक्रम करू. कशी वाटते आयडिया?’’
आयडिया अनोखी व भन्नाट होती. डॉक्टर आलेत म्हटल्यावर लोकांची झुंबड उडाली असती, पण डॉक्टरांना आवरण्याची ताकद माझ्या दुबळय़ा हातात नव्हती. हलाहल पचवणं शंकराला जमलं होतं, मी पामर मर्त्य मानव होतो.
डॉक्टरांच्या एका नाटकाला मी पहिल्या अंकानंतर प्रेक्षकांसमवेत चहापान करीत होतो. माझ्या कानांवर एक संभाषण पडलं.
‘‘घाणेकर टाइट आहे. नेहमीच असतो.’’
‘‘नाही हो.’’ मी मध्ये तोंड खुपसून म्हणालो, ‘‘मुळीच नाही.’’
‘‘तुम्हाला काय माहित्येय?’’ तो माणूस चिडून म्हणाला, ‘‘अहो, प्यायल्याशिवाय तो रंगभूमीवर उभाच राहू शकत नाही.’’
मी वाद वाढवला नाही. थेंबही न घेतलेल्या डॉक्टरांबद्दल माझ्या मनात कणव दाटून आली. पण त्यांनीच आपल्या वागण्यानं आपलं नाव खराब केलं होतं.
एकदा डॉक्टरांसमवेत मी हार्ट अटॅकमधून सावरत असलेल्या नेपथ्यकार श्याम आडारकर यांच्या समाचाराला गेलो होतो.
‘‘मला डॉक्टरांनी रोज ग्लासभर म्हशीचं दूध घ्यायला सांगितलं,’’ डॉक्टर आजारी आडारकरांना म्हणाले.
‘‘तू असं कर, काश्या’’ आडारकर पडल्या पडल्या म्हणाले, ‘‘तू म्हशीला व्हिस्की पाज. मग तिचं दूध पी. म्हणजे तुझे दोन्ही हेतू साध्य होतील.’’
डॉक्टरांची बोलती बंद झाली होती.
डॉक्टर विजय कापडी यांच्यासह वरळीला दंतवैद्यकी करीत. मी त्यांना कधीही दात उपटताना पाहिले नाही. त्यांचा अनेकांवर दात मात्र होता. त्यांना वचकून राहवं लागे. त्यांना सहन करावं लागे. प्रेक्षकांचे मात्र ते लाडके होते. ‘आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ असं जाहिरातीत व नाटकाच्या बोर्डावर श्रेयनामावलीत दिसलं की, प्रयोग हाऊसफुल्ल होई.
डॉक्टरांच्या पश्चात माझ्या एका महोत्सवी एकपात्री प्रयोगाला डॉक्टरांच्या पत्नी कांचन आल्या होत्या. त्यांच्याकडे फुलांचे दोन गुच्छ होते. त्यातला दुसरा मला देताना त्या म्हणाल्या, ‘‘हा डॉक्टरांतर्फे.’’
मी गलबललो.

[email protected]