खेल खतम पैसा हजम

  • शिरीष कणेकर

कबूल करतो की, मी मनातून धास्तावलो होतो. दुसऱ्या डावात विजयासाठी आवश्यक असलेल्या 49 धावादेखील आपला संघ करू शकेल की नाही याबद्दल माझ्या मनात धाकधूक होती. अलीकडेच ऑस्ट्रेलियात आपण केवळ 36 धावांत नव्हतो उखडले गेलो? पहिल्या कसोटीत 578 धावांचा डोंगर उभारणारा हाच इंग्लिश संघ अहमदाबादला पहिल्या डावात अवघ्या 112 धावांत नव्हता आटोपला? दुसऱ्या डावांत तर त्यांनी 81 धावांत चंबूगबाळं गुंडाळून हिंदुस्थानविरुद्ध धावसंख्येचा नीचांक गाठला होता. या पार्श्वभूमीवर 49 धावाही आपल्याला भारी पडू शकतात ही माझी भीती अनाठायी म्हणता येणार नाही. प्रत्यक्षात एकही विकेट न गमावता रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी आरामात 49 धावा काढल्या ही गोष्ट वेगळी व अभिमानास्पद.

मोटेराची विकेट (मोदींनी दिल्लीहून व अमित शहांनी स्वतः मॅचला हजर राहून ती ‘फिरवली’ म्हणतात) कसोटीयोग्य होती की नाही यावर आता खडाजंगी सुरू झाल्येय. विकेटला आरोपमुक्त करीत कर्णधार विराट कोहलीनं उभय संघांच्या कचखाऊ फलंदाजीला दोष दिला. विकेट फिरकीला अनुपूल असली तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, बहुसंख्य फलंदाज सरळ जाणाऱ्या चेंडूवर बाद झाले हा युक्तिवाद सुनील गावसकरचा होता. पुठला चेंडू वळेल व पुठला सरळ जाईल याचा विकेटमुळे व गुलाबी चेंडूमुळे अंदाज लागत नसल्यानं फलंदाज बाद होत होते हे गावसकर बोलला नाही.

विकेट कसोटी क्रिकेटला लांच्छनास्पद होती याबद्दल माझ्या मनात दुमत नाही. आता काही लोक हिरीरीनं म्हणतात की, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया त्यांच्या वेगवान गोलंदाजांना पूर्णपणे वश असणाऱ्या अशा आग ओकणाऱ्या विकेटस् बनवतात व प्रतिपक्षाच्या फलंदाजांना पळता भुई थोडी करतात हे चालतं वाटतं? मग आम्ही आमच्या फिरकी माऱ्याला धार्जिण्या अशा विकेटस् बनवल्या तर बिघडलं पुठं? नाही नाही, तेही चूक व हेही चूक. एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्यानं वासरू मारायचं नसतं. केवळ विकेटस्च्या सहाय्याने सामना जिंकणे हा पराक्रम नव्हे!

विकेट कसोटी क्रिकेटसाठी सर्वथा अयोग्य होती हे निर्विवादपणे सिद्ध करणारे हे काही पुरावे घ्या –

(1) दोन दिवसांत सामना संपला.

(2) सबंध सामन्यात इंग्लंडचा जिऑफ्रे आर्चर व हिंदुस्थानचा इशांत शर्मा यांनी प्रत्येकी केवळ एक विकेट काढली.

(3) विकेट सुरुवातीपासूनच फिरकीला अनुपूल असल्याने सामन्यात वेगवान गोलंदाजांचा सहभाग औषधापुरता होता. दोन्ही संघांच्या दुसऱ्या डावात नवीन चेंडूदेखील वेगवान गोलंदाजांकडे सोपवला गेला नाही.

(4) कामचलाऊ फिरकी गोलंदाज अशी आजवर ज्याची ओळख होती त्या कर्णधार जो रुटचे गोलंदाजीचे पृथक्करण असे होते – 6.2 षटके, 3 निर्धाव, 8 धावा व 5 विकेटस्! किती नामवंत फिरकी गोलंदाजांना 8 धावांत 5 बळी घेण्याचं भाग्य लाभलंय?

इंग्लंड या असल्या विकेटवर एकच फिरकी गोलंदाज घेऊन उतरला ही घोडचूक होती असं म्हटलं गेलं, पण रुट अशी अभूतपूर्व कामगिरी करीत असेल तर चूक काय नि काय काय! आठ धावांत पाच विकेटस् याच्या वरताण कामगिरी कोण करणार होतं? विकेटनं (व विकेटपुरता) रुट महान फिरकीपटू झाला.

फिरकी गोलंदाजी खेळण्यात व करण्यात हिंदुस्थान निःसंशय इतर संघांपेक्षा वाप्बगार आहे. म्हणूनच शंभरला तीननंतर उर्वरित सात खेळाडू पंचेचाळीस धावांत माघारी जावेत हे नाही म्हटलं तरी थोडं धक्कादायकच होतं. आपण पहिल्या डावात बऱ्यापैकी आघाडी घेऊ व विजय सुकर होईल अशीच आपली समजूत होती. त्या पार्श्वभूमीवर लीच व रुट यांची करामत अप्रतिम होती. त्यांचं क्षेत्ररक्षण नेहमीप्रमाणेच उत्तम होतं (पोपनं कोहलीचा सोपा झेल सोडला, पण ते महागात पडलं नाही). दुसऱ्या डावात आपल्या सलामीच्या जोडीनं पहिल्या डावाची पुनरावृत्ती होऊ दिली नाही. रोहित शर्मा विशेष उल्लेखनीय. तो कसोटी क्रिकेटसाठी योग्य मानला जायचा नाही. त्याला तोच जबाबदार होता. मर्यादित षटकांच्या व टी-20 च्या क्रिकेटमधील बादशहा हे त्याचं यथार्थ वर्णन होतं. या कसोटी मालिकेत त्यानं झोकात पुनरागमन गेलंय. वेलकम् रोहित! (पाकिस्तानचा आजचा सर्वोत्पृष्ट फलंदाज बाबर आझमी म्हणतो की, मर्यादित षटकांच्या लढतीत तीन सर्वश्रेष्ठ नावं आहेत- विराट कोहली, डिव्हिलियर्स व रोहित शर्मा!)

अश्विनविषयी बोलावं तेवढं कमीच आहे. तो डोकेबाज गोलंदाज आहे. सतत नवनवीन प्रयोग करीत असतो. पोपची दोन्ही डावांत चक्क लेगब्रेकवर त्यानं दांडी उडविली. डोळय़ांचं पारणं फिटलं. पोपला मात्र त्या दोन चेंडूंची नुसती आठवण झाली तरी त्याची झोप उडेल. अक्षर पटेलनं अक्षरशः कहर केला. त्याच्याच शहरात तो ‘अनप्लेयेबल’ ठरला. त्याच्या अद्भुत यशात विकेटचा वाटा असला तरी त्याचं यश त्यामुळे पाणचट ठरत नाही. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात सलामीवीर क्रॉली व बेअरस्टो यांची पहिल्याच षटकात उडविलेली दांडी आठवली तरी अंगावर रोमांच उभे राहतात. भविष्यात त्याला एवढे यश मिळेल की नाही शंका आहे, पण शंका घेणारे आपण कोण? मिळेलही.

चारशे विकेटस्चा विक्रमी टप्पा गाठण्यासाठी अश्विनला सर्वश्रेष्ठ ऑफस्पिनर मुरलीधरनपेक्षा केवळ पाच सामने जास्त खेळावे लागलेत ही गोष्ट पुरेशी बोलकी आहे. अश्विनचे 77 कसोटींत 401 बळी झालेत. आता 132 सामन्यांत 619 बळी घेणारा पुंबळे त्याला खुणावीत असेल. अजिंक्य रहाणेचे फलंदाजीतील सातत्यपूर्ण अपयश संजय मांजरेकरप्रमाणेच मलाही खुपतंय. पुछ करो भाई! पुजारा व रहाणे यांची जागा घेणारे गुणी फलंदाज सध्या पुठे आहेत? शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं की अँडरसन, ब्रॉड व बुमराह जिथं फक्त खेळणारे प्रेक्षक ठरतील अशा विकेटस् यापुढे नको रे बाप्पा!

कोणीतरी मला एक चारोळी पाठवल्येय-

अक्षर वाचण्यात

इंग्लंड निरक्षर

हे सगळय़ांना पटेल

यावर नाना पाटेकरनं मला लिहिलंय

माघात अश्विनची कमाल

ऋतू बदललेत

हे अक्षरशः पटेल

ग्लोबल वॉर्मिंग

[email protected]

 

आपली प्रतिक्रिया द्या