रोहित शर्मा का आला?

शिरीष कणेकर

नवजात कन्यारत्नाला पाहण्यासाठी रोहित शर्मा चौथा कसोटी सामना सोडून मायदेशात परतला हे वाचून खरं सांगायचं तर मला धक्का बसला. रोहितला मुलीला बघण्याची अनिवार ओढ असणार हे स्वाभाविक आहे, पण त्यासाठी मालिकेतली अंतिम लढत सोडून निघून येणं मला स्वाभाविक वाटत नाही. त्याने आठवडाभर कळ काढणं उचित व अपेक्षित नव्हतं का? क्रिकेट नियामक मंडळ असल्या गोष्टींना मान्यता कशी देतं? मुलगी ही रोहितची ‘प्रायॉरिटी’ असू शकते, पण मंडळाची ती ‘प्रायॉरिटी’ कशी? एरवी नियमांवर बोट ठेवून काटेकोरपणे वागण्याबद्दल (कु) प्रसिद्ध असणारे मंडळ रोहितच्या बाबतीत इतके मायेनं ओथंबलेले कसे झाले? पुढेमागे महिला संघातर्फे ती खेळेल अशी मंडळाची दूरदृष्टी असू शकेल. मंडळानं रोहितचा जाण्यायेण्याचा खर्च केला असणारच.

काल परवापर्यंत रोहितचं कसोटी संघातील स्थान दोलायमान होतं. खरं म्हणजे स्थानच नव्हतं. या मालिकेतही तो आत-बाहेर होता. मेलबोर्नला तिसऱ्या कसोटीत त्यानं नाबाद 64 (व 5) धावा केल्यावर पुढल्या सामन्यात त्याचा समावेश निश्चित मानला जात होता. तिथे चांगली कामगिरी बजावत तो संघातील आपले स्थान बळकट करू शकला असता. मग त्यानं ही सुवर्णसंधी का गमावली? कदाचित त्याला ती सुवर्णसंधी वाटत नसावी. पुन्हा एकदा अपयशाचा शिक्का माथी लागेल अशी त्याच्या मनात धास्ती असावी. त्यानंतर साहजिकच नवजात लेकीचं पारडं जड झालं असावं. रोहित रक्ताच्या ओढीनं आला याबाबत माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही, पण कर्तव्याला त्यानं महत्त्व दिलं नाही हेही तितकंच खरं. ऐन वेळेला माघार घेऊन आपण संघाची गोची करतोय, ही खंत त्याला वाटल्याचे दिसत नाही.

आता कसं झालंय बघा. त्याच्या (आतापर्यंतच्या) शेवटच्या सामन्यात त्यानं मोलाच्या 64 (नाबाद) धावा काढल्यात. म्हणजेच‘ऍज द थिंग्ज स्टँड टुडे’ त्याचं संघातील सहाव्या क्रमांकावरील स्थान तूर्तास तरी अबाधित आहे. याचाच अर्थ मध्येच मायदेशात परतल्यानं रोहित या फलंदाजाचे काही नुकसान झालेलं नाही. नुकसान झालंच असेल तर संघाचं, क्रिकेट नियामक मंडळाचं व क्रिकेट प्रेमींचं. पहिल्या दोघांची भूमिका कळत नाही व आपल्या मताला किंमत नाही.
7 जानेवारीला पहिली कसोटी संपते व 12 जानेवारीला एकदिवसीय शृंखला सुरू होते. दरम्यानच्या काळात मुंबईत जाऊन येणं रोहित शर्माला अशक्य होतं का?

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या