चोरट्यांनी वखारीत ठेवलेल्या कांद्यांची केली चोरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी परिसरात घरफोडी, कृषी पंप चोरी, केबल चोरी तसेच कृषी साहित्याची दुकाने चोरट्यांनी फोडल्याच्या घटना ताज्या असतानाच आणि या गुन्ह्यांचा तपास लागत नाही तोच आता टेमकर वस्ती येथील शेतकऱ्याच्या वखारीतून कांद्याची चोरी झाल्याने शेतकरी वर्गात असुरक्षिततेचे वातावरण असल्याची भावना निर्माण झाली आहे.

टेमकर वस्तीतील म्हसेफाटा येथे चारीच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरेश लोखंडे यांच्या वखारीतून रात्रीचे चोरट्यांनी सुमारे 15 पिशव्या कांदे चोरून नेले आहेत. त्यामुळे लोखंडे यांना 18 ते 20 हजार रुपयांचा नाहक फटका बसला आहे. ही घटना दि. 15 ऑक्टोबरला रात्री घडली. यापूर्वी शेतातून कांदे काढून नेणे, भरलेल्या पिशव्या उचलून नेणे, डाळिंबाच्या बागेतून डाळींब तोडून नेणे, असे प्रकार घडलेले आहेत. परंतु आता वखारीतले कांदे भरून नेल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

आधीच अवकाळी पावसाचा तडाखा, त्यातून पालेभाजी, पिकांचे झालेले नुकसान, शेतमालाचे पडलेले बाजारभाव, सातत्याने असलेली बिबट्यांची दहशत या समस्यांनी हैराण झालेला शेतकरी अनेक संकटांशी सामना करीत उभारी घेत असतानाच त्यांच्या कष्टावरच डल्ला मारला जात असल्याने हताश झाल्याचे लोखंडे यांनी सांगितले.

शिरूरच्या बेट भागातील घरफोडी, कृषी पंप चोरी, केबल चोरी, शेतमाल चोरी अशा चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून या चोरांना आळा कधी बसणार ? जोपर्यंत हे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होत नाही तोपर्यंत हे सत्र असेच सुरू राहणार का ? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.