कारेगाव मधील महिला रणरागिणींचा अवैध धंद्यांविरोधात एल्गार

51

सामना प्रतिनिधी। कवठे येमाई

शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील महिलांनी गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात एल्गार पुकारला. या रणरागिणींनी ऑनलाइन लॉटरी,बिंगो,दारु, मटका हे असे बेकायदे धंदे करत असलेल्या दुकानांवर अचानक हल्लाबोल केला. यावेळी संतप्त महिलांनी दुकानांमधील वस्तू रस्त्यावर आणून फोडुन टाकल्या. महिलांचा हा रुद्रावतार पाहून अनेक अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

कारेगाव येथे मुख्य चौकातच मोठया प्रमाणात बिंगोची दुकाने व बेकायदेशीर दारूची दुकानं आहेत.तसेच येथे भाजी बाजार,किराणा माल व कपड्याची दुकाने आहेत. सायंकाळी औद्योगिक वसाहतीत कामाला असणाऱ्या महिला याच रस्त्याने घरी जात असतात.अनेक महिला तेथे भाजीपाला खरेदी करण्यासाठी व इतर खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे या दारुड्यांकडुन अनेक वेळा महिलांना त्रास सहन करावा लागतो.कारेगाव येथे हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे. कारेगाव येथे बिंगो लॉटरी मोठया प्रमाणात चालू असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून यावर पोलीस मात्र कारवाई करत नाहीत असा नाराजीचा सूर महिलांनी व्यक्त केला आहे.

शुक्रवारी ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त गावातील ग्रामपंचायत सदस्या अर्चना नवले,दुर्गा नवले,राखी नवले,मनिषा नवले,पल्लवी नवले,व इतर महिलांनी कारेगाव येथील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रितसर निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा बिंगो लॉटरी चालू असलेल्या दुकानाकडे वळवला. परंतु बिंगो वाल्यांना आधीच माहिती मिळाल्याने त्यांनी दुकाने बंद करुन सर्व साहित्य आत ठेऊन पोबारा केला. पण महिलांनी रणरागिणीचे रुप धारण केल्याने महिला आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी कुलूप तोडुन बिंगोच्या दुकानांची तोडफोड केली.त्यामध्ये अनेक ठिकाणी अवैध दारुचे बॉक्स आढळुन आल्याने महिलांनी दारूच्या बाटल्या फोडुन अवैध दारु नष्ट केली. यावेळी गावातील युवक मोठया प्रमाणात महिलांच्या मदतीसाठी एकत्र आले.त्यांनी महिलांना यावेळी मोठया प्रमाणात सहकार्य केले.त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

तर या नंतर पोलिसांनी केलेल्या कारवाई बाबत मनीषा नवले व कारेगाव येथील महिलांनी समाधान व्यक्त केले आहे. महिलादिनी अवैध धंद्यावर हल्लाबोल करीत एल्गार पुकारणाऱ्या कारेगाव येथील महिलांचे शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या