
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसामध्ये स्वाभिमानाचा वन्ही चेतवला. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ अशी घोषणा देत अखंड हिंदुस्थानात हिंदुत्वाचा अंगार फुलवला. देव, देश आणि धर्मासाठी सर्वस्वाचा त्याग करून जनकल्याणार्थ झोकून देणारी पिढी निर्माण केली. 17 नोव्हेंबर हा शिवसेनाप्रमुखांचा महानिर्वाण दिन. आपल्या लाडक्या साहेबांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱयातील हिंदू, शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींचा जनसागर बुधवारी शिवतीर्थावर उसळणार आहे.
शिवसेनाप्रमुख म्हणजे साक्षात सहस्ररश्मी शिवतेज. हिंदुत्वाचे धगधगते अग्निकुंड. मराठी माणसामध्ये त्यांनी स्वाभिमान केवळ जागृतच केला नाही तर तो त्यांच्या नसानसात भिनवला. साहेबांच्या विचारांनी मराठी माणूस आणि हिंदूंच्या मनगटात ताकत दिली. अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची ऊर्मी निर्माण केली. 17 नोव्हेंबर 2012 रोजी हे शिवतेज अनंतात विलीन झाले. पण शिवसेनाप्रमुखांचे ज्वलंत विचार आजही प्रेरणा देत आहेत, स्फूर्ती देत आहेत. वर्तमानाला इतिहास घडवण्याचे सामर्थ्य देत आहेत. निर्भिडपणे जगायला शिकवत आहेत. अशा प्रेरणादायी, स्फूर्तिदायी, सामर्थ्यदायी हिंदूतेजासमोर नतमस्तक होण्यासाठी उद्या सारा हिंदुस्थान शिवतीर्थावरील शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळी दाखल होणार आहे.
2012नंतर दरवर्षी 17 नोव्हेंबरला शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावर अलोट जनसागर मानवंदना द्यायला येतो. गतवर्षी कोरोना संकटामुळे बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर जाता आले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे निवडक नेते आणि पदाधिकाऱयांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळी आदरांजली अर्पण केली. उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसार देशभरातील शिवसेना शाखांमध्ये कोविड नियमावलीचे पालन करत शिवसेनाप्रमुखांना श्रद्धांजली अर्पण केली गेली. यंदा निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे शिवतीर्थावर साहेबांच्या स्मृतीस्थळी शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी आणि नागरिकांना पुष्पांजली अर्पण करता येणार आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
































































