
शिवसेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया मुंबईकरांसाठी सवलतीच्या दराने एसी लक्झरी बस सोडण्यात आल्या असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या गाडय़ा कुरार व्हिलेज, तानाजी नगर व टाइम्स ऑफ इंडिया या भागातून कोकणातील साखरपा, देवरुख, सावंतवाडी, मालवण या ठिकाणी सोडण्यात आल्या आहेत.
विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू यांनी शुक्रवारी गाडय़ांना भगवा ध्वज दाखवला. त्यानंतर बस कोकणच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. या गाडीतून जाणाऱया प्रत्येक प्रवाशाला शिवसेनेच्या वतीने गणेश पूजा साहित्य, पिण्याचे पाणी आणि अल्पोपाहाराचे वाटप करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांनी शिवसेनेचे आभार मानले.
यावेळी विभाग संघटक शालिनी सावंत, विधानसभा संघटक प्रशांत कदम, उपविभागप्रमुख सुनील गुजर, रुचिता आरोस्कर, विधानसभा संघटक रीना सुर्वे, शाखाप्रमुख मनोहर राणे, उपविभाग समन्वयक कृष्णा सुर्वे उपस्थित होते.

























































