
मालवण शहरातील अर्धवट स्थितीतील व रखडलेल्या गटार खोदाई प्रश्नी नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार वैभव नाईक यांनी बुधवारी मालवण शहरात येत ठेकेदार सुपरवायझर यांना फैलावर घेतले. ठेकेदाराच्या हातात असलेली फाईल आमदारांनी काढून घेत चांगलेच झापले. पालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्यावरही आमदार नाईक यांनी नाराजी व्यक्त केली.
गटार खोदाईचा ठेका घेऊनही काम रखडून ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे. तसेच शहरात रखडलेली गटार खोदाई प्रशासनाने पूर्ण करून घ्यावी, असे आमदार नाईक यांनी मुख्याधिकारी यांना सांगितले.
दरम्यान, मालवण शहरातील गटारांची पाहणी आमदार वैभव नाईक यांनी प्रशासनाला सोबत घेऊन केली. तुंबलेल्या गटारांचे वास्तव व गटार खोदाईचा पर्दाफाश करण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, संमेश परब, किरण वाळके, महेंद्र म्हाडगूत, तपस्वी मयेकर, प्रसाद आडवणकर, स्वप्निल आचरेकर, बाळू नाटेकर, सिद्धार्थ जाधव, मनोज मोंडकर यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, यतीन खोत यांनीही गटार खोदाई कामाबाबत ठेकेदार व प्रशासनाच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. वारंवार सांगूनही योग्य पद्धतीने काम झाले नाही. मात्र 4 लाख पेक्षा जास्त बिल प्रशासनाकडून ठेकेदाराला देण्यात आले. याबाबत तक्रार आमदार नाईक यांच्याकडे करण्यात आली.





























































