महागाई-बेरोजगारी प्रचंड वाढली; जनतेकडे दुर्लक्ष, सरकारचा वेळ गद्दारांच्या मागण्या पूर्ण करण्यात जातोय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात महागाई-बेरोजगारी प्रचंड वाढली असताना, अस्मानी संकटामुळे शेतकरी संकटात असताना ‘मिंधे’ सरकारचा वेळ मात्र ‘गद्दारां’च्या मागण्या पूर्ण करण्यात जात आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठे दिसत नाहीत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष नाही, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज तोफ डागली.

शिवसेनेच्या वतीने बोरिवली येथे आयोजित रोजगार मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी ‘खोके’ सरकारचा चांगलाच समाचार घेतला. सत्ताधारी पक्ष महाराष्ट्रातले रोजगार पळवत असताना शिवसेनेच्या माध्यमातून रोजगार दिले जात असल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्यांच्या मागण्या पूर्ण करीत असताना गद्दार राक्षसी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात मग्न होते. राज्याला पुढे न्यायाचा विचार त्यांचा कधीही नव्हता. सत्तेत बसल्यावर तरी लोकांच्या मागण्या पूर्ण करणे गरजेचे असताना हे सरकार गद्दारांच्या मागण्या पूर्ण करतेय असे ते म्हणाले. मंत्रिमंडळाचा विस्तार करता करता सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि आता डिसेंबरही निघून जाईल. हे सरकार पडल्यावरही विस्ताराची चर्चा सुरू राहील, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्यपाल नाही, ‘राजकीय नेते’

सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल हे राज्यपाल नसून, ‘राजकीय नेते’ असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. आमचं सरकार असताना विधानसभा अध्यक्ष नेमला नाही, 12 आमदारांच्या नियुक्ती प्रलंबित ठेवली असेही ते म्हणाले. त्यामुळे राज्यपाल हटवण्यासाठी विशेष मोहीम राबवली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मी राज्याला पुढे नेण्याचा ‘जॉब’ करतोय

मुख्यमंत्री सर्व गद्दार आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी फिरताहेत. आता पुन्हा गुवाहाटीला गेले आहेत. तिथून गोव्याला जाणार का, असा सवालही त्यांनी केला. आम्ही मात्र महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करतोय. मला पण ‘जॉब’ आहे. तो म्हणजे, ‘महाराष्ट्राला पुढे नेण्याचा, चांगल्या मार्गावर नेण्याचा’ आणि जे कुणी संविधानाविरोधी काम करताहेत, महाराष्ट्राच्या विरोधात काम करताहेत, महाराष्ट्राला मागे नेत आहेत, त्यांना कामावरून काढून टाकण्याचा जॉब मला मिळालाय, असे ते म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)