विकास नियोजन रस्त्यातील बाधितांना दिलासा, कुरारमधील झोपडीधारकांना मिळाली हक्काची घरे; शिवसेनेच्या प्रयत्नांना यश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या प्रयत्नामुळे मालाड पूर्व कुरार गाव भागातील विकास नियोजन रस्त्यातील कामामुळे बाधित होणाऱया झोपडीधारकांना त्याच परिसरात हक्काचे घर मिळाले आहे. घराचे स्वप्न साकार झाल्यामुळे या रहिवाशांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.

मालाड पूर्व कुरार गाव भागातील संस्कार का@लेज ते जी.जी. महालकरी मार्ग या नियोजित 18.30 मीटर विकास नियोजन रस्त्यातील पहिल्या टप्प्यातील बाधित झोपडीधारकांचे त्याच परिसरात पुनर्वसन करण्यासाठी शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू आणि आणि स्थानिक नगरसेवक अजित रावराणे यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. 172 पैकी पहिल्या टप्प्यातील बाधित 55 झोपडीधारकांना न्याय मिळाला. नुकतेच या रहिवाशांना मालाड येथील पी पूर्व कार्यालय या ठिकाणी शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू, नगरसेवक अजित रावराणे, प्रभाग समिती अध्यक्ष हैदर अली शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत घराच्या चावीचे वाटप करण्यात आले. प्रकल्पाच्या दुसऱया टप्प्यातील उर्वरित 117 झोपडीधारकांच्या घरांसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन देण्यात आले. या कार्यक्रमाला पी पूर्व सहाय्यक आयुक्त रुपाली सरमळकर, सहाय्यक अभियंता खरात, अभियंता माने, देशमुख, सूर्यवंशी आदी उपस्थित होते.