गद्दारांना गाडणे हा शिवसेनेचा इतिहास आहे! महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांची टीका

शिवसेना पक्षाशी गद्दारी करून निवडणुकीत शिवसेनेविरोधात उभे राहणाऱया गद्दारांना गाडल्याचा शिवसेनेचा आतापर्यंतचा इतिहास आहे. माझगावकरांनीही हे वेळोवेळी दाखवून दिले आहे. यावेळीही गद्दारांना गाडण्यासाठी माझगावकर पुढाकार घेतील, असा विश्वास दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरविंद सावंत यांनी व्यक्त केला.

दक्षिण मुंबई मतदारसंघातील भायखळा विधानसभा क्षेत्रात म्हातर पाखाडी नाका येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत ते बोलत होते. अरविंद सावंत म्हणाले, भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकले, पण आपच्या कोणत्याही आमदाराने असा विचार केला नाही की, आपण आता मुख्यमंत्री बनू या, पण भाजपमुळे असे महाराष्ट्रात घडले. भाजपने मराठी माणसामध्ये दंगे लावले, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, दक्षिण मध्य मुंबईत भ्रष्टाचाराने कळस गाठलेला उमेदवार महायुतीने उभा केला असून त्याचा पराभव करा, असे आवाहन शिवसेना उपनेते मनोज जामसुतकर यांनी केले. यावेळी शिवसेना दक्षिण मध्य लोकसभा समन्वयक सुधीर साळवी, उपविभागप्रमुख बबन गावकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, लोकसभा सहसमन्वयक सत्यवान उभे, उपविभागप्रमुख राम सावंत, काँग्रेसचे रवी बावकर, माजी आमदार मधू चव्हाण, माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर, मुंबई जिल्हाध्यक्ष सुरेखा पाटील, राष्ट्रवादीचे रूपेश खांडके, बबन कनावजे, राज राजापूरकर, नसीम सिद्दीकी, आपचे विपुल भोसले तसेच महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

मोदींचा रोड शो नाही तर रडका शो
शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी भाषणाच्या सुरुवातीला महाराष्ट्र मच्छीमार विकास संघाने जाहीर पाठिंबा दिल्याची घोषणा केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात याआधी पाच टप्प्यांत निवडणुका झाल्या नव्हत्या. जेव्हा प्रशासन कमी पडते तेव्हाच हे असे होते. हे सरकार नालायक आहे याचे हे उत्तम उदाहरण आहे. हे सरकार 50 खोकेवाल्यांचे, विश्वासघातकी लोकांचे असून पंतप्रधानांचा रोड शो नसून रडका शो होता, असे ते म्हणाले.