पॉलिटेक्निकला जाणाऱ्या 100 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

एका विषयात नापास झाल्याने वांद्रे पूर्व येथील पॉलिटेक्निक इंजिनीअरिंग महाविद्यालयात प्रवेश मिळत नसलेल्या 100 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याची माहिती मिळताच शिवसेनेने महाविद्यालय प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा देताच नरमलेल्या प्रशासनाने या विद्यार्थ्यांना दाखल करून घेण्याचे मान्य केले.

पॉलिटेक्निकल इंजिनीअरिंग महाविद्यालयात सुमारे 100 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नव्हता. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात शिकणारे हे विद्यार्थी आहेत. एका विषयात नापास असले तरी या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेशाची संधी होती, मात्र महाविद्यालयाने या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला होता. शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हासह संपर्कप्रमुख भाई विचारे यांना याविषयीची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन प्राचार्या स्वाती देशपांडे, प्रशासकीय अधिकारी नाईक यांची भेट घेतली.या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने प्रवेश नाकारल्यास शिवसेनेच्या वतीने उपोषणाला बसण्याचा इशारा देताच महाविद्यालयाने या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. याप्रसंगी शिवसेनेचे सुरेश जाधव, कल्पेश बावेशी, दादा गोवले, प्रदीप जाधव आदी उपस्थित होते. प्रवेशाचा मार्ग सुकर झाल्याने या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी शिवसेनेचे आभार मानले.