
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे लवकरच ब्रिटनहून मायदेशी परत येणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी प्रकाशित झालं होतं. या संदर्भात महाराष्ट्र सरकार आणि ब्रिटनमध्ये एक करार करण्यात आला आहे. मात्र, या करारानुसार ही वाघनखे महाराष्ट्राला कायमस्वरुपी देण्यात येणार नसून ती तीन वर्षांच्या कर्जाऊ तत्वावर मायदेशी येणार आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1659मध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी विजापूरचा सरदार अफझलखान याचा ज्या वाघनखांनी कोथळा काढला होता, ती ऐतिहासिक वाघनखे सध्या ब्रिटनच्या ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट’ या संग्रहालयात ठेवण्यात आलेली आहेत. ही वाघनखं नोव्हेंबर महिन्यात हिंदुस्थानात आणली जाणार आहेत. या वाघनखांच्या वाहतूक आणि सुरक्षेसाठी 11 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. मायदेशी आल्यानंतर एकूण चार मुख्य संग्रहालयात ती ठेवण्यात येणार आहेत.
यात मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम, नागपूर येथील सेंट्रल म्युझियम आणि कोल्हापूर येथील लक्ष्मी विलास पॅलेस यांचा समावेश आहे. मात्र, ही वाघनखं फक्त तीनच वर्षांसाठी हिंदुस्थानात असणार आहेत. तसा स्पष्ट उल्लेख ब्रिटनसोबत झालेल्या करारात करण्यात आला आहे. त्यानंतर ती पुन्हा ब्रिटन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमला परत देण्यात येणार आहेत.




























































