नगरपालिका निवडणूक, शिवसेनेच्या 12 शिलेदारांचे अर्ज दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कर्जत

कोणत्याही परिस्थितीत कर्जत नगरपालिकेवर भगवा फडकवणारच, असा दृढ निर्धार करीत आज शिवसेनेच्या 12 शिलेदारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 27 जानेवारी रोजी ही निवडणूक होत असून त्याकडे संपूर्ण रायगड जिह्याचे लक्ष लागले आहे. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या सुवर्णा जोशी यांनी अर्ज दाखल केला असून उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे.

कर्जत नगरपालिकेत सध्या राष्ट्रवादीची सत्ता असून शिवसेनेचे 6, भाजप 2 व राष्ट्रवादी 9 असे बलाबल आहे. शिवसेना यावेळेस 16 जागांवर निवडणूक लढवत असून आज 12 जणांनी वाजतगाजत, मोठय़ा उत्साहात निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बोंबले यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्यापूर्वी दुपारी 12 च्या सुमारास कर्जतचे ग्रामदैवत असलेल्या धापया देवस्थान येथे सर्वांनी दर्शन घेतले आणि शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. भगवे झेंडे आणि शिवसेना झिंदाबादच्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला.

कर्जत नगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार केला असल्याचे संपर्कप्रमुख दत्ता दळवी, शिवसेना जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हाप्रमुख महेंद्र थोरवे, विधानसभा संघटक संतोष भोईर, विजय पाटील, तालुकाप्रमुख संभाजी जगताप, राजेश जाधव, महिला जिल्हा संघटक रेखा ठाकरे, शहरप्रमुख रोहिदास मोरे, भालचंद्र जोशी, आरपीआयचे शहराध्यक्ष अरविंद मोरे आदी उपस्थित होते.