
सामना प्रतिनिधी । मेहकर
शनिवारी झालेल्या नगरपरिषदेच्या विषय समिती निवडणुकीत सर्व सहाही समितीवर शिवसेनेने विजय मिळवला आहे.
नगरपरिषदेत शिवसेना १४ व कॉंग्रेस १० असे बलाबल आहे. नगराध्यक्ष कॉंग्रेसचा आहे. आज विषय समित्यासाठी निवडणूक झाली. त्यात सहाही जागेवर शिवसेना विजयी झाल्याने शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व झाले आहे. विजयी विषय समिती सभापतीमध्ये उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती जयचंद बाठीया, शिक्षण सभापती, ज्योती मनोज घोडे, पाणीपुरवठा सभापती मीरा महादु तायडे, आरोग्य सभापती संगीता नरेंद्र रिंढे, विकास व नियोजन सभापती मनोज जाधव, महिला व बालकल्याण सभापती हलिमा हनिफ गवळी यांची निवड झाली आहे. सहापैकी बांधकाम, पाणीपुरवठा व आरोग्य या समित्या अविरोध तर बाकी तिनसाठी मतदान घेण्यात आले.
स्थायी समिती सदस्य पदी शिवसेना गटनेते संजय जाधव व नगरसेवक ओम सौभागे यांची निवड झाली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शिवसेना खासदार प्रतापराव जाधव व शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन केले होते. त्यानुसार आज निवडणूक झाली. यावेळी शिवसेनेचे सर्व नगरसेवक हजर होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार संतोष काकडे यांनी काम पाहिले.
































































