मानवंदना! सोमवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन; शिवसैनिकांच्या मेळाव्याकडे अवघ्या देशाचे लक्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

23 जानेवारी हा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन आणि दैनिक ‘सामना’चा वर्धापन दिन. त्यानिमित्त  शिवसेनाप्रमुखांना भक्तिभावाने  अभिवादन करण्यासाठी  दक्षिण मुंबईतील रिगल सिनेमासमोरील त्यांच्या पूर्णाकृती पुतळय़ासमोर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत.

उद्धव ठाकरे काय बोलणार… देशभरात उत्सुकता

रिगल सिनेमाजवळ शिवसेनाप्रमुखांना अभिवादनानंतर उद्धव ठाकरे षण्मुखानंद सभागृहातील कार्यक्रमासाठी सायनच्या दिशेने निघतील. षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी 6. 30 वाजता शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधतील. महाराष्ट्रातील खोके सरकारचा भोंगळ  कारभार, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर, महाराष्ट्रातील उद्योगांची पळवापळवी यावर उद्धव ठाकरे कसा प्रहार करतात याविषयी उत्सुकता आहे. पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱयानंतर लगेचच हा मेळावा  होत असल्याने उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे.

येत्या सोमवारी रिगल सिनेमासमोर सायंकाळी 5 वाजता शिवसेनाप्रमुखांना अभिवादनाचा विशेष सोहळा होईल. उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते, उपनेते, खासदार, आमदार, शिवसेनेशी संलग्न संघटनांचे पदाधिकारी, विभागप्रमुख, शाखाप्रमुख यांसह सर्व पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, युवासैनिक आणि शिवसेनाप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित राहणार आहेत. तमाम जनतेच्या वतीने यावेळी शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यात येईल.

आमने सामने

शिवसैनिकांच्या मेळाव्याप्रसंगी सध्या तुफान गाजत असलेल्या ‘आमने सामने’ या मराठी नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. लीना भागवत, रोहन गुजर, केतकी विलास आणि मंगेश कदम यांच्या अभिनयाने नटलेल्या या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन नीरज शिरवईकर यांनी केले आहे.