
मुंबईत वाढत्या कोरोनाचा धोका लक्षात घेऊन राज्य आणि मुंबई महापालिका कोरोना नियमांची कठोर अंमलबजावणी करत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी हे अत्यावश्यक असले तरी हातावर पोट असलेल्या गरीब, गरजू तसेच तृतीयपंथीयांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे त्यांना अन्नपाकिटे पुरवा, अशी मागणी शिवसेनेने महापालिकेकडे केली आहे.
मुंबईत वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. यात केवळ सरकारी तसेच आरोग्य कर्मचाऱयांनाच लोकल प्रवासात सूट दिली असून इतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांना बेस्ट आणि खासगी वाहने वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. त्याचबरोबर जीवनावश्यक साहित्याची दुकाने वगळता इतर दुकाने केवळ सकाळी 7 ते सकाळी 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची पुरवानगी दिली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतरांना सार्वजनिक ठिकाणी महत्त्वाचे कारण असेल तरच बाहेर पडता येणार आहे. यामुळे ज्यांचे हातावर पोट आहे अशा गरीब, गरजूंचा रोजचा रोजगार बुडत असून त्यांना मुंबई महापालिकेने अन्नपाकिटे पुरवावीत. त्याचबरोबर रस्ते, लोकलमध्ये भीक मागणाऱया तृतीयपंथीयांचीही उपासमार होत आहे. त्या पार्श्वभूमीवर, गरीब, गरजू आणि तृतीयपंथीयांना अन्नपाकिटे पुरवा किंवा नगरसेवक निधीतून ही पाकिटे वाटप करण्यास नगरसेवकांना परवानगी द्या, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका सोनम जामसुतकर यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडे केली आहे.


























































