
सामना प्रतिनिधी, परळी वैजनाथ
आधीच कमी झालेल्या पावसामुळे शेतकरी त्रस्त आहे. शेतकऱ्यांना लागणाऱ्या बी-बियाणे, खते खरेदीसाठी तालुक्याच्या ठिकाणी कधीही यावे लागते असे असताना ऐन पेरणीच्या काळात परळी बंद ठेवण्यात येऊ नये आणि या बंदचा कोणालाही त्रास होऊ नये, अशा आशयाचे व्यंकटेश शिंदे यांची स्वाक्षरी असलेले निवेदन शिवसेनेकडून परळी पोलिस प्रशासनाला देण्यात आले आहे.
आधीच दुष्काळामुळे बळीराजा त्रस्त आहे. त्यात मान्सूनचे जिल्ह्यात म्हणावे तसे आगमन झालेले नसल्याने बाजरपेठाही थंड पडलेल्या आहेत. शनिवार 6 रोजी काही संघटनांकडून परळी शहर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. हा बंद झाल्यास शहरात विविध शेतीकामासाठी शहरात येणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी अडचण होऊ शकते. या बंदमध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये ही काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. हे निवेदन शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, शहर प्रमुख राजेश विभुते, युवासेना तालुका अधिकारी अमर टाकळकर,जिल्हा सहसंघटक रमेश चोंडे, उपशहर प्रमुख, अभिजित धाकपाडे प्रसिद्धी प्रमुख शुभम जोशी, शहर समन्वयक सुदर्शन यादव, माजी उपशहर प्रमुख सचिन स्वामी उपस्थितीत पोलीस प्रशासनाला देण्यात आले.






























































