
16 आमदारांबाबतचा जो निर्णय द्यायचा आहे तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी योग्य वेळी द्यावा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे नार्वेकर लवकरात लवकर कारवाई करतील, अशी अपेक्षा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अनिल देसाई यांनी व्यक्त केली. दरम्यान, शेडय़ुल 10चे उल्लंघन होत असल्याने अध्यक्षांना 16 आमदारांना अपात्र करावे लागेल, असे त्यांनी सांगितले. शिवसेना नेते अनिल देसाई हे आज साईदर्शनासाठी शिर्डी येथे आले होते. साईदर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अनिल देसाई म्हणाले, ‘संविधानिक सरकार महाराष्ट्राच्या विधिमंडळात असणे आवश्यक आहे. शिंदे-फडणवीस सरकार संविधानिक नाही हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाने दाखवून दिले आहे. विधानसभेतील 16 आमदार निश्चित अपात्र होतील, कारण त्यांनी व्हीपचे उल्लंघन केले आहे. शेडय़ुल 10चे उल्लंघन होत असल्याने अध्यक्षांना आमदारांना अपात्र करावे लागेल,’ असे त्यांनी सांगितले.
फडणवीस वागले ती नैतिकता आहे का?
देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या बाबतीत स्वतःकडे पाहावे. ते जे वागले ती नैतिकता आहे असे त्यांना वाटते का, फडणवीस जी मते मांडत आहेत ती त्यांच्या मनाला तरी पटतात का, याचा त्यांनी विचार केला तरी खूप आहे, असे अनिल देसाई यांनी सांगितले.


























































