सत्तेसाठी दानवे यांनी नगरकरांना तीनशे कोटींचे गाजर दाखवले – उपनेते अनिल राठोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

निवडणूकीमध्ये संपर्क कार्यालय हे महत्वाचे. त्यातूनच सर्व नियोजन केले जाते. या प्रभागात काही दिवसांपूर्वी असे चित्र होते की, हे जे पॅनल आहे ते काय करणार. पण या दोन-चार दिवसात वातावरण बदलले आणि आता सर्वात ताकदवर पॅनल शिवसेनेचे झाले आहे. सोमवारी या भागात सभा झाली. त्यामध्ये रावसाहेब दानवे म्हणाले की, नगरला पाणी आम्ही पाजू. अरे तुम्हाला पाणी नगर जिल्हा पाजतो. तुम्ही काय आम्हाला पाणी पाजणार. या दानवेला त्याच्या भागात चकवा म्हणतात म्हणून ते नगर शहराला चकवा देण्यासाठी आले आणि सत्तेसाठी दानवे नगरकरांना तीनशे कोटीचे गाजर दाखवून गेले, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.

प्रभाग क्र.५ मधील प्रोफेसर कॉलनी चौक येथे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार पराग गुंड पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अधिकृत उमेदवार विणा बोज्जा, कलावती शेळके, जयंत येलूलकर, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार,युवासेना जिल्हाअध्यक्ष विक्रम राठोड संदिप कुलकर्णी, संग्राम शेळके प्रशांत चौधरी, अजय गुंड, रामदास भोर, ऋतपिक येलूलकर, काका शेळके, श्रीनिवास बोज्जा, पप्पू शेळके, बाळासाहेब सांगळे, पांडूरंग रोकडे, अरुण बोरुडे, किशोर महामुनी, संदिप चाटे, नितीन वाकळे, संतोष लष्करे, संतोष चिलवेरी, दिपाली गुंड, अर्चना गुंड, नंदा गुंड, उषा ओझा उपस्थित होते.

राठोड पुढे म्हणाले, भाजपवाले काहीही बोलले. जनतेला चकवा देण्यासाठी तीन-चारशे कोटींचे हे गाजर दाखवतायत. आतापर्यंत यांचे कुणी हात धरले होते का? १०० कोटी आणायचे तरी होते. यांच्या नुसत्या गप्पा आहेत. शिवसेना खोटे बोलत नाही म्हणून नगरकरांचा विश्वास हा शिवसेनेवर आहे. म्हणून आम्ही महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी तत्पर आहोत.

याप्रसंगी घनशाम शेलार म्हणाले, नगरमध्ये प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये शिवसेनेची सत्ता मनपात आली पाहिजे अशी भावना आणि धारणा आहे. भाजपच्या दानवेंच्या सभेत बॅनरवर ‘परिवर्तन होणारच, नगर बदलणारच’ असे होते. त्यांच्यात परिवर्तनाची सुरवात झाली ती आपण केडगावपासून पाहिली. आता नगर भाडपामध्ये बदल होणार आहे. यापूर्वीची गुंडगिरी करणारे लोक वेगळे होते. आता गुंडगिरी भारतीय जनता पार्टीच्या बॅनर खाली होणार आहे, अशा प्रकारची चर्चा नगर शहरातील प्रत्येक मतदारांच्या तोंडी आहे. शिवसेनेच्या विरुद्ध भाजपा, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची छुपी युती किवा छुपी आघाडी झाली आहे. या अभद्र आघाडीला नगरची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.