
सामना ऑनलाईन, हिंगोली
येथील सामान्य रुग्णालयात रोजंदारी व कंत्राटी पदावर असलेल्या कर्मचाऱ्यांना अचानकपणे कुठलीही पुर्वसुचना न देता कामावरुन कमी केले आहे. या कर्मचाऱ्यांना परत कामावर घ्यावे, या मागणीसाठी आज १६ जुलै पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी कामगारांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी उपोषणाला भेट देऊन पाठींबा दिला आहे. हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मागिल १२ ते १३ वर्षापासुन रोजंदारीने विविध पदावर कर्मचारी काम करत होते. मात्र, ४ जुलै रोजी हिंगोली येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी कुठलीही पुर्वसुचना न देता या कर्मचार्यांना कामावरून कमी केले आहे. त्यामुळे या कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कामावरुन कमी केल्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न या बेराजगार कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
तसेच सर्व कर्मचारी भुमिहिन असून शेतीमध्येही त्यांना रोजगार नाही. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कामावर रुजू करुन घ्यावे, असा इशारा कर्मचार्यांनी निवेदनाव्दारे दिला होता. राज्याचे आरोग्य आयुक्त संजीवकुमार हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनाही निवेदन देण्यात आले होते. १६ जुलै पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. यामध्ये संजय सुतारे, हनुमंत भुरे, अनिस प्यारेवाले, गजानन खडसे, सतीश कदम, अशोक गाडे, सविता कऱ्हाळे, सुनिता भोरे, ध्रुपता गाडे, इंदुताई भिसे, छायाबाई कांबळे, तुकाराम देवरे, मारोती गिरी, देवीदास वाव्हळ, दुर्गादास खडसे, प्रताप खंदारे, राम बांगर, सागर भालेराव यांच्यासह स्वच्छता सेवक व सुरक्षारक्षक, धोबी आदींचा समावेश आहे. शिवसेनेचे हिंगोली जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांनी उपोषणस्थळी जाऊन या रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून जिल्हाप्रमुख बांगर यांनी या कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर रुजू करून घ्यावे अशी मागणी केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास यांनी या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू करून घेण्याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिल्याचे शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांनी सांगितले आहे.

































































