शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण, सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांच्या निकालावर 16 किंवा 19 फेब्रुवारीला सुनावणीची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली. या प्रकरणावर आता पुढची सुनावणी शुक्रवार 16 किंवा सोमवार 19 फेब्रुवारीला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालासंदर्भात दाखल याचिकेवर 22 जानेवारीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. यासंदर्भात शिंदे गटाची बाजू मांडताना वकील ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे आणि महेश जेठमलानी यांनी अशीच याचिका या आधीच मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. त्यामुळे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात चालविण्यात यावे, अशी मागणी केली. तर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातच चालवले पाहिजे, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी करत शिंदे गटाच्या वकिलांच्या मागणीला जोरदार विरोध केला.

राज्यसभेच्या 6 जागांसाठी 27 फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर हे प्रकरण आणि सुनावणी महत्त्वाची असल्याचे कपिल सिब्बल न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत सुनावणी लवकरात लवकर घेण्याची विनंती केली आहे.