
सामना प्रतिनिधी । हिंगोली
औंढा नागनाथ तालुका संपुर्ण दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि वंचित शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यात यावी, यासह शेतकरी हिताच्या अन्य मागण्यांसाठी आज गुरूवारी शिवसेनेच्या वतीने औंढा नागनाथ तहसील कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. ‘कोण म्हणतो देणार नाही… घेतल्याशिवाय राहणार नाही…’, ‘शिवसेना जिंदाबाद…’, ‘जय भवानी… जय शिवाजी…’ अशा जयघोषात ढोल-ताशांचा दणदणाट करत निघालेल्या या मोर्चामध्ये हजारो शेतकरी व शिवसैनिक सहभागी झाले.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी व हिंगोली या तीन तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र, वसमत आणि औंढा नागनाथ हे दोन तालुके वगळण्यात आले आहेत. औंढा नागनाथ तालुका शिवसेनेच्या वतीने जि.प. गटनेते तथा कृऊबा सभापती अंकुश आहेर यांनी दुष्काळाच्या मागणीसाठी मोर्चाचे आयोजन केले होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, जि.प. गटनेते अंकुश आहेर, डॉ. अजय जयप्रकाश मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा औंढा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. या मोर्चाच्या माध्यमातुन शिवसेनेने प्रामुख्याने औंढा नागनाथ तालुका त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्यात यावी, तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे त्वरित चालु करावी, मागेल त्या शेतकऱ्यास सिंचन विहीर देण्यात यावी, जळालेले विद्युत रोहित्र विना विलंब व विनाअट बदलुन देण्यात यावे, स्थानिक पोलीस प्रशासनाकडुन होणारे सामान्य नागरिकांचे अपमान व दमदाटी बंद करावी, कृषी विभागाकडून देण्यात येणारे यांत्रिकरणातील अवजारे शेतकऱ्यांना वेळेवर द्यावेत तसेच मागेल त्या शेतकऱ्यांना रोहयो अंतर्गत फळबाग योजना देण्यात यावी, सन २०१६-१७ मधील कर्जमाफीतील वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, रब्बी हंगामासाठी पीक कर्ज तात्काळ मिळावे, गतवर्षीच्या तूर, हरबऱ्याचे चुकारे शिवाय बोंडअळीच्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, रब्बी हंगामासाठी जिथे सिंचनाची व्यवस्था असलेल्या ठिकाणी पुर्ण क्षमतेने आणि दिवसा १० तास विज पुरवठा करावा तसेच सिद्धेश्वर कालव्यात पाणी सोडण्यात यावे, दुष्काळाची परिस्थिती भिषण असल्याने पीक विम्याचा लाभही शेतकऱ्यांना लवकरात लवकर देण्यात यावा शिवाय ग्रामीण भागात भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता टँकर व अन्य सुविधेसाठी नियोजन करावे, सक्तीची विजबील वसुली थांबवावी, शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
आज २९ नोव्हेंबर रोजी बसस्थानक समोरुन दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिवसेना जिंदाबाद… यासह शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत घोषणा देत वाजत-गाजत धडक मोचाला सुरुवात झाली. तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर भव्य सभेमध्ये झाले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, अजय मुंदडा, अंकुश आहेर, पं.स. सभापती भीमराव भगत, उपसभापती रामप्रसाद कदम, जि.प. सदस्य श्रीशैल्य स्वामी, झटे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख जी.डी. मुळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, मोहनराव बोथीकर यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे राजेंद्र सांगळे, राजाभाऊ मुसळे, अनिल देशमुख, साहेबराव देशमुख, बंडु चोंढेकर, बबन ईघारे, पांडुरंग नागरे आदींसह शिवसैनिक व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



























































