
हा फुटणार, तो फुटणार, असे अंदाज वर्तवणाऱ्यांचे नशीब फुटले आहे, त्यांनी ते बघावे. महाराष्ट्रामध्ये यापुढे भाजपचे राज्य कधीच येणार नाही, हे आपण कागलच्या चौकात जाहीर करत आहोत, असा विश्वास शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. पुरोगामी विचारांचे हे राज्य आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून शिवसेना उभी राहिली आहे. ही शिवसेना आणि सरकारचे नेतृत्व करणारे उद्धव ठाकरे हेच यापुढे राज्याचे नेतृत्व करत राहतील, असे वातावरण महाराष्ट्रात निर्माण झाल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले. कोणी कितीही आपटू दे, आपटून आपटून त्यांची चपटी होईल, पण त्यांचे राज्य येणार नाही, असेही ते म्हणाले.
आज आपण शाहू महाराजांना भेटलो. राज्यात शिवसेनेविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. काहीजण म्हणतात शिवसेनेने छत्रपती संभाजीराजे यांना फसवले. काय फसवले ते सांगा. ज्यांनी शिवसेनेला मातोश्रीमध्ये दिलेला शब्द पाळला नाही. शब्द न पाळत ज्यांनी शिवसेनेला फसवले, ते आरोप करत आहेत. भाजपने शब्द पाळला नाही, त्यामुळे जनतेला चांगले सरकार मिळाले आहे. काही गोष्टी घडतात, त्या चांगल्यासाठीच घडतात. ते यातून दिसून येते.
शिवसेना ही फसवणाऱ्यांची संघटना नाही. शिवसेनेने कधीही कोणच्याही पाठीत खंजीर खुपसला नाही. शिवसेनेला छत्रपतींच्या घराण्याबाबत आदर आहे, त्यामुळे गैरसमज निर्माण करू नका, असे राजर्षी शाहू महाराजांनी सांगितले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे सगळे नेते आडवे झाले आहेत.
सामान्य शिवसैनिक असलेले संजय पवार गेले 30 वर्षे खांद्यावर भगवा घेऊन सर्वसामान्यांसाठी संघर्ष करत आहेत. त्या संजय पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला. हे फक्त शिवसेनेतच होऊ शकते. इतर धनदांडग्याच्या पक्षात फक्त व्यापार चालतो, असा आरोपही संजय राऊत त्यांनी केला. शिवसेनेत फक्त सच्चे कार्यकर्ते आहेत. शिवसेनेत सर्व राष्ट्रभक्त आणि हिंदुत्ववादी आहेत. आमच्या राष्ट्रभक्तीत भेसळ नाही, असेही त्यांनी विरोधकांना ठणकावले.
कश्मीरमध्ये गेल्या तीन महिन्यात दहशतवाद्यांचे 55 हल्ले झाले. आतापर्यंत 23 पोलीस अधिकारी मारले गेले आहेत. तर 17 कश्मीरी पंडितांची हत्या करण्यात आली. भाजपचे हिंदुत्ववादी सरकार काय करत आहे. राहुल भट या कश्मीर पंडित असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याला कार्यालयात दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. अशा घटना घडत असताना पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री कोठे आहेत, असा सवालही संजय राऊत यांनी केला. कश्मीरबाबत बोलायला भाजपचे कोणीही तयार नाही, असे ते म्हणाले.
भाजपचे हिंदुत्व वाराणसीच्या ज्ञापवापी मशीदीत आहे, तेथे सर्वेक्षण केले. वाढती महागाई बेरोजगारी याबाबत भाजपचे कोणीही बोलत नाही. हेच आहे का भाजपचे हिंदुत्व असा सवालही त्यांनी केला. रामाचे राजकारण करून झाले आता ते औरंगजेबाचे नाव घेत आहेत. राम ते औरंगजेब असा यांचा प्रवास आहे. औरंगजेबाची कबर कोठे आहे. त्याला कोणी गाडला. या महाराष्ट्रात मराठ्यांनी गाडला औरंगजेबाला. ती कबर केंद्रीय पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. ती कबर फोडून टाका. तेवढी हिंमत आहे का तुमच्यात. अचानक त्यांना औरंगजेबाबत प्रेम का निर्माण झाले. भाजपचा आणि औरंगाजेबाचा संबंध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात जन्म घेतला म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे. औरंगजेबाचा जन्म गुजरातच्या दोहाद गावात झाला. त्याची आताची वंशावळ दिसतेय ती आपल्यावर चालून येत आहे. औरंगजेबाच्या काळात दिल्लीवाले महाराष्ट्रावर चालून आले. आजही आपला त्यांच्याशी संघर्ष सुरू आहे, असे राऊत यांनी सांगितले.


























































