
महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या योजना समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवा, जनतेची कामे करा व गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक ही संकल्पना राबवा, अशा सूचना शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसैनिकांना दिल्या.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसैनिक व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. सातारा जिह्यातील आगामी जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सातारा जिह्यात संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कराड येथील मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आले होते. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी सातारा, सांगली संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, हर्षद कदम, महिला आघाडीच्या अनिता जाधव, तालुकाप्रमुख नितीन काशिद, शशिकांत हापसे, शहरप्रमुख शशिराज करपे, राजेंद्र माने, मोमीन शेख, दीपक मुट्टल, अजित पुरोहित, शंभू रैनाक, दिलीप यादव, सुनील पाटील, रवि हिनुकले, शहाजी जाधव, प्रवीण लोहार, ज्ञानदेव भोसले, अक्षय मोहिते यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
‘धर्मवीर’ चित्रपटात कुणीही राजकारण आणू नये
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नीलेश राणे यांनी ट्विटद्वारे राजकीय भाष्य केले होते. त्यावर खासदार श्रीकांत शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे साहेब यांनी शिवसेना वाढविली. मुंबईनंतर ठाणे जिल्हा शिवसेनेचा आहे. यामधून ‘धर्मवीर’चे विचार लोकांपर्यंत जात आहेत. सिनेमातूनही धर्मवीर कशाप्रकारे जगले हे पुढच्या पिढीला शिकवते. याच्यावर कुणी राजकारण करत असेल ते बरोबर नाही. त्यामुळे या चित्रपटावरून राजकारण आणू नये, असे आवाहन त्यांनी केले.



























































