संभाजीनगरात शिवसेनेचे जोरदार आंदोलन,भाजप कार्यालयात जनावरे नेली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
राम शिंदे आमचे पाहुणेच आहेत, असे म्हणत अंबादास दानवे यांनी राम शिंदेंच्या कार्यालयात जनावरे बांधण्याचा प्रयत्न केला.

सामना ऑनलाईन,संभाजीनगर

‘चारापाणी नसेल तर जनावरे पाहुण्यांच्या दावणीला नेऊन बांधा’ अशी उद्दाम भाषा वापरून शेतकऱ्यांचा अवमान करणारे भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्याविरोधात मराठवाडय़ात संतापाची लाट उसळली आहे. शिवसेनेने संभाजीनगरात जोरदार आंदोलन केले. भाजप आमचा पाव्हणाच आहे, त्यामुळे जनावरे त्यांच्या कार्यालयात बांधणार, असे म्हणत शिवसैनिकांनी भाजप कार्यालयात जनावरे नेली, पण पोलिसांनी दंडेली करून वाटेतच त्यांना अडवले. एवढेच नाही तर शिवसैनिक भाजपच्या कार्यालयापर्यंत पोहचू नयेत यासाठी पोलिसांनी तेथे खडा पहाराही ठेवला.

राम शिंदेंच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन: पाहा फोटो

राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी पाथर्डी येथे केंद्राच्या दुष्काळी पथकासमोरच चारापाणी नसेल तर जनावरे पाहुण्यांच्या दावणीला नेऊन बांधा असा बिनडोक सल्ला देत भेटायला आलेल्या शेतकऱ्यांची थट्टा केली. हा सारा प्रकार सुरू असताना तेथे असलेले भाजपचे कार्यकर्ते फिदीफिदी हसत होते. राम शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

भाजपचे मंत्री राम शिंदे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिवसैनिकांनी जनावरे भाजपच्या कार्यालयासमोर नेऊन बांधण्याचा निर्णय घेतला. दुपारी चार वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नूतन कॉलनीतील कार्यालयापासून जनावरे घेऊन शिवसैनिकांचा ताफा गुरुगोविंदसिंगपुऱ्यात असलेल्या भाजपच्या कार्यालयाकडे निघाला. यावेळी शिवसैनिकांनी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. शिवसेनेने अचानक केलेल्या या आंदोलनामुळे पोलिसांचे धाबे दणाणले. क्रांतीचौकाच्या जवळ येताच सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी शिवसैनिकांचा ताफा अडवला.

या आंदोलनात जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, कृष्णा पा. डोणगावकर, संतोष जेजूरकर, तालुकाप्रमुख बप्पा दळवी, जि.प.चे गटनेते अविनाश गलांडे आदींचा सहभाग होता.