
सामना ऑनलाईन, ठाणे
रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे बारवी धरण ओव्हरफ्लो झाले आणि दिव्यासह कल्याण ग्रामीणचा भाग पुरात बुडाला. यामध्ये हजारो रहिवाशांच्या संसाराचा अक्षरशः चिखल झाला. त्यांना आर्थिक मदतीचा हात पुढे करून सरकारने दिलासा द्यावा यासाठी शिवसेनेने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पूरग्रस्त कुटुंबांना 15 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच पुरामुळे नादुरुस्त झालेले वीज मीटर तत्काळ विनामूल्य बदलून देण्यात येतील अशी ग्वाही दिली.
मुसळधार पावसामुळे बारवी धरण ओव्हरफ्लो झाले. मात्र त्याचा फटका दिव्यासह कल्याण ग्रामीण भागाला बसला. अशावेळी शिवसेना आमदार सुभाष भोईर मदतीला धावले. दिवा विभागात तळ ठोकून संपूर्ण परिसरामध्ये बोटीतून बचावकार्यात भाग घेतला. तसेच पूरग्रस्तांना निवारा तसेच जेवणाची व्यवस्थादेखील केली. मात्र यावेळी पुरात रहिवाशांचे अतोनात नुकसान झाल्याचे आढळल्याने सुभाष भाईर यांनी शिवसेना नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्यासंदर्भात मागणी केली. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी हा मुद्दा उचलून धरला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी 15 हजार रुपये व ज्या व्यक्तीचे वीज मीटर पाण्याखाली जाऊन नादुरुस्त झाले असतील अशा व्यक्तींना नवीन वीज मीटर बसवून देण्यास मंजुरी दिली.




























































