साठवण तलावाच्या मागणीसाठी शिवसेनेने केला ‘रास्ता रोको’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । किल्ले धारुर

आरणवाडी साठवण तलावाचे रखडलेले काम सुरू करा, या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सचीन मुळुक यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रमुख नारायण कुरुंद यांच्या उपस्थितीत चोरांबा येथे एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आरणवाडी साठवण तलावाचे काम गेल्या 20 वर्षांपासून रखडलेले आहे. याच मुद्यावर अनेक लोकप्रतिनिधी आमदार झाले. मात्र, हा तलाव करण्यास कोणीही पुढे आले नाही.

या परीसरातील आरणवाडी,चोरांबा,थेटेगव्हाण,ढगेवाडी,सोनिमोहा,पारगाव आदी गावांसाठी हा तलाव वरदान ठरणार असून, या परीसरातील सर्व जनतेचा हा तलाव जिव्हाळ्याचा विषय झाला आहे. या परीसरातील जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या जिव्हाळ्याच्या मुद्यावर शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रमुख नारायण कुरुंद यांच्या उपस्थितीत व शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांनी तलावाचे काम पूर्ण होईपर्यंत शिवसेना याचा पाठपुरावा करेल. हा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. या परीसरातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आहोत, असे सांगितले. तसेच यावेळी जिल्हा सहसंघटक योगेश नवले ,तालुका प्रमुख नारायण कुरुंद, शेतकरी संघटनेचे काशीराम सिरसट, रामदास तिडके आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी तालुका प्रमुख विनायक ढगे, शहर प्रमुख बंडु शिनगारे,राजकुमार शेटे यांच्यासह शेकडो शेतकरी आणि शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी तहसिलदार लंगडापुरे मँडव व लघु पाट बंधारे विभागाचे कुलकर्णी यांनी निवेदन स्वीकारले .