हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन… स्मृतीस्थळावर उसळणार भक्तांचा मेळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान ज्वलंत ठेवला. मराठी माणसाला ताठ मानेने जगण्याची चेतना दिली. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी धमन्यांमध्ये बळ दिले. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ अशी घोषणा देत अखंड हिंदुस्थानातील हिंदू जागा केला. देव, देश आणि धर्मासाठी झोकून देणारी पिढी निर्माण केली. शिवसैनिक त्यांच्यावर केवळ प्रेम करत नाहीत तर त्यांची भक्ती करतात. आजही त्यांचे विचार नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरतात. 17 नोव्हेंबर हा शिवसेनाप्रमुखांचा महानिर्वाण दिन. महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱयातील लाखो हिंदू, शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी आपल्या लाडक्या साहेबांना उद्या मानवंदना देणार आहेत. उद्या शिवतीर्थ हे भक्तीतीर्थ होऊन तिथे भक्तांचा मेळा उसळणार आहे.

दूरदृष्टी आणि निःस्वार्थ न्यायवृत्ती लाभलेले कणखर नेतृत्व, अद्वितीय वक्ता, साक्षेपी संपादक, सिद्धहस्त व्यंगचित्रकार, दिलदार माणूस असे शिवसेनाप्रमुखांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू होते. शिवसेनाप्रमुख म्हणजे हिंदुत्वाचे धगधगते अग्निपुंड. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन मराठी माणूस अन्यायाविरुद्ध पेटून उठला. धर्मरक्षणासाठी तमाम हिंदूंना प्रेरणा मिळाली. लाखो, करोडो लोकांमध्ये अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची ऊर्मी निर्माण करणारे हे शिवतेज 17 नोव्हेंबर 2012 रोजी अनंतात विलीन झाले. शिवसेनाप्रमुख शरीररुपाने आपल्यात नाहीत, पण त्यांचे विचार आजही प्रेरणा देत आहेत. निर्भिडपणे जगण्याची, दुष्ट शक्तींविरुद्ध लढण्याची स्फूर्ती देत आहेत. या स्फूर्तीदायी, प्रेरणादायी शिवतेजासमोर नतमस्तक होण्यासाठी उद्या महाराष्ट्र आणि देशभरातून शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमी शिवतीर्थावर दाखल होणार आहेत.

धगधगती मशाल
मराठमोळय़ा मातीमधली धगधगती मशाल
शिवसेनेच्या चैतन्याची सळसळती मशाल
जरी भोवती टपून बसले शत्रू दाही दिशांना
खाक कराया सज्ज कधीची जळजळती मशाल
शिवबांचा वारसा आम्हाला; प्रबोधनाची वाट…
असे ठाकरी बाण्याची ही झगमगती मशाल
सत्तेसाठी, खुर्चीसाठी जे जे पळून गेले…
हिशेब त्यांचा करेल चुकता फडफडती मशाल
गद्दारांची मुळीच नाही भीती कुणाला येथे
निष्ठेच्या तेजाने उजळे लखलखती मशाल
काय मिळाले तुम्हाला सांगा सोडून ‘मातोश्री’ला?
थेट एक हा सवाल करते खणखणती मशाल!
– माधव डोळे