वैधानिक समित्यांवर शिवसेनेचा विजय निश्चित; ‘भाजप’चा पाठिंबा, विरोधकांचा एकही अर्ज नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महानगरपालिका वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदी तिसऱ्या वर्षी पुन्हा एकदा शिवसेनेच्याच उमेदवारांचा विजय होणार असल्याचे निश्चित झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार आज स्थायी समिती अध्यक्षपदासाठी यशवंत जाधव, सुधार समितीसाठी सदानंद परब आणि शिक्षण समितीसाठी अंजली नाईक यांनी पालिका चिटणीस प्रकाश जेकटे यांच्याकडे अर्ज सादर केले तर ‘बेस्ट’ समितीसाठी अनिल पाटणकर यांनी संयुक्त सचिव प्रभुणे यांच्याकडे अर्ज सादर केला. शिवसेना उमेदवारांना भाजपने पाठिंबा दिला असून विरोधकांकडून अर्जच दाखल झाला नसल्याने शिवसेनेचा विजय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पालिकेच्या वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसह 50 टक्के सदस्यांची मुदत एक वर्षाने संपल्यानंतर पुन्हा नियुक्ती करण्यात येते. दरवर्षी एप्रिलमध्ये या निवडणुका होतात. यानुसार नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या विविध समित्यांवरील पक्षांच्या सदस्यांची नावे महासभेत महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी नुकतीच जाहीर केली. आता स्थायी समिती, सुधार समिती, शिक्षण समिती, ‘बेस्ट’ समितीच्या अध्यक्षांची निवड 3 एप्रिल रोजी होणार आहे. पालिकेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला भाजपनेही पाठिंबा दिल्यामुळे सर्व उमेदवारांचा विजय बिनविरोध होणार असल्याचे निश्चित आहे. शिवसेना उमेदवार अर्ज सादर करताना सभागृह नेत्या विशाखा राऊत, दिलीप लांडे, मंगेश सातमकर, आशीष चेंबूरकर, किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, रमेश कोरगावकर, अनंत (बाळा) नर, संजय घाडी, राजुल पटेल, अनिल कोकीळ, राजू पेडणेकर, चंद्रशेखर वायंगणकर, संजय घाडी, सुजाता सानप, भाजप गटनेते मनोज कोटक आदी उपस्थित होते.

तीन समित्यांवर खांदेपालट
स्थायी समितीत यशवंत जाधव हे सलग दुसऱया वर्षी अध्यक्षपदी विराजमान होणार असून शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्या जागी अंजली नाईक, सुधार समिती अध्यक्ष दिलीप (मामा) लांडे यांच्या जागी सदानंद परब आणि ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांच्या जागी अनिल पाटणकर यांना शिवसेनेने संधी दिली आहे.

‘शिवसेना, युती झिंदाबाद’ने पालिका दुमदुमली
शिवसेना उमेदवार अर्ज सादर करताना शिवसेना नगरसेवकांसह भाजप नगरसेवकही मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘शिवसेना-भाजप युतीचा विजय असो’ अशा जोरदार घोषणा दिल्यामुळे ‘शिवसेना, युती झिंदाबाद’ने पालिका दुमदुमून गेली. यावेळी भगवे झेंडे, भगवी उपरणी यामुळे पालिकेत भगवे वातावरण निर्माण झाले होते.

पक्षीय बलाबल
शिवसेना – 93
भाजप – 85
काँग्रेस – 30
राष्ट्रवादी – 9
सपा – 6
मनसे – 1
एमआयएम – 2
काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे पद रद्द (प्रकरण न्यायालयात)
एकूण – 227