वृत्तपत्र विक्रेत्यांना जास्तीत जास्त मदत करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऊन, पाऊस, वादळवाऱ्याची तमा न बाळगता घरोघरी वृत्तपत्र पोहोचवण्यासाठी धडपडणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना कल्याण निधीच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत देण्याचा निर्धार मुंबई वृत्तपत्र विक्रेते कल्याण निधी संस्थेच्या बैठकीत करण्यात आला. संस्थेची पहिली बैठक मंगळवारी शिवसेना भवन येथे पार पडली. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध समस्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

रोजचे वर्तमानपत्र घरोघरी पोहोचवण्यासाठी जिद्दीने काम करणाऱया व्यवसायनिष्ठ सेवकांसाठी आता वृत्तपत्र उद्योग पुढे सरसावला आहे. मुंबई वृत्तपत्र विक्रेते कल्याण संस्थेची नुकतीच स्थापना करण्यात आली. मुलांचे आजार, मुलांचे उच्चशिक्षण यासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांना आर्थिकदृष्टय़ा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वृत्तपत्र विक्रेत्यांना सहाय्य करण्यासाठी संस्थेतर्फे कल्याण निधी उभारण्यात येत आहे. या नवनिर्मित संस्थेच्या कार्यकारी मंडळाची पहिली बैठक संस्थेचे अध्यक्ष सुभाष देसाई यांनी मंगळवारी शिवसेना भवन येथे घेतली. या बैठकीला बाजीराव दांगट, रॉकी रॉड्रिक्स (टाइम्स ग्रुप), दीपक शिंदे (सामना ग्रुप), संजय तेलंगे (इंडियन एक्प्रेस ग्रुप), प्रतीक नानावटी (मिड डे ग्रुप) हे प्रकाशकांचे प्रतिनिधी तर वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रतिनिधी म्हणून मधुसूदन सदडेकर, संजय चौकेकर व रवी चिले उपस्थित होते.