बेळगाव महापालिकेसमोरील बेकायदा लाल-पिवळा ध्वज हटवा, शिवसेनेचा कन्नडीगांना इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena-logo-new

मूठभर कन्नड रक्षण वेदिकेच्या (करवे) गुंडांनी बेळगाव महापालिकेसमोर फडकविलेला बेकायदेशीर लाल-पिवळा ध्वज अजूनही हटविलेला नाही. तसेच सीमाभागात शिवसेना पदाधिकाऱयांवर होणारे हल्ले आणि कार्यालय बंद करण्यासाठी सुरू असलेल्या दडपशाहीविरोधात शिवसेनेकडून पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर, सांगली, सातारा जिह्यांतील सर्व कानडी व्यवसाय उद्या बंद करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी पुणे-बंगळुरू महामार्गावर उचगाव येथे कर्नाटकात जाणाऱया वाहनांवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून कर्नाटक सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात आला.

दरम्यान, साताऱयातील कन्नड व्यावसायिकांनी शनिवारी (दि. 20) सर्व व्यवहार बंद ठेवावेत; अन्यथा शिवसेना स्टाइलने उत्तर देण्याचा इशारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी दिला आहे. मराठी भाषिकांवरील अत्याचार थांबवावेत म्हणून निर्वाणीचा इशारा देण्यासाठी आज सायंकाळी पुणे-बंगळुरू महामार्गावरील उचगाव येथे कर्नाटकात जाणाऱया वाहनांवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून पाठविण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी ‘बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘शिवसेना झिंदाबाद’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी कर्नाटक सरकारविरोधात जोरदार घोषणाही देण्यात आल्या. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली सुजित चव्हाण, राजू यादव, शशिकांत बिडकर आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.