
घरामागील परडय़ात पोलवरून तुटून पडलेल्या विद्युत तारेवर पाय पडून वृद्धेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जावळी तालुक्यातील हुमगाव येथे रविवारी सकाळी घडली आहे. या घटनेत वृद्धेला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचे जावई गंभीर जखमी झाले आहेत.
यशोदाबाई दशरथ कदम (वय 82, मूळ रा. कोल्हापूर) असे मृत वृद्धेचे नाव असून, प्रवीण दत्तात्रय धुमाळ (वय 60) हे जखमी झाले आहेत.
कोल्हापूर येथे राहणाऱ्या यशोदाबाई कदम या गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या लेकीच्या घरी वास्तव्याला आहेत. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या घरामागील परड्यात गेल्या असता, लगतच्या पोलवरून तुटून पडलेल्या विद्युत तारेवर त्यांचा पाय पडला. या तारेत विद्युतप्रवाह सुरू असल्यामुळे विजेच्या धक्क्याने त्या जागीच कोसळल्या.
त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांचे जावई प्रवीण धुमाळ हे बाहेर आले. सासूला वाचविण्यासाठी पुढे आले असता, त्यांनाही विजेचा धक्का बसला व ते बेशुद्ध झाले. परिसरातील नागरिकांनी तातडीने गावातील वीजप्रवाह बंद केला. त्यानंतर धुमाळयांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, यशोदाबाई यांचा जागीच मृत्यू झाला होता.




























































