
दुकानात खरेदी करायला आलेल्या ग्राहकाला कोरोना झाल्याची विचारणा करणाऱ्या दुकानदारावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. सुदैवाने या हल्ल्यात दुकानदार बचावला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
ही घटना नवी दिल्लीची आहे. जखमी झालेल्या दुकानदाराचं नाव विपिन असं आहे. विपिन हा श्याम कॉलनी येथे राहतो. त्याच्या काकाचं शनि बाजार येथे कपड्यांचं दुकान आहे.
23 ऑक्टोबर रोजी विपिन आपल्या काकांच्या दुकानावर होता. त्या दरम्यान तिथे एक ग्राहक आला. तो ग्राहक सतत खोकत होता. त्याचं खोकणं पाहून विपिनने त्याला कोरोना झाला आहे का? अशी विचारणा केली. या प्रश्नाने ग्राहक संतापला आणि तो विपिनशी वाद घालू लागला.
ग्राहक निघून गेल्यानंतर काही वेळाने तिथे दोन तरुण आले. त्यांनी विपिनशी भांडायला सुरुवात केली. त्यांच्या हातातल्या सळ्यांनी त्यांनी विपिनवर वार केले आणि तिथून निघून गेले. विपिनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांनी विपिनच्या तक्रारीवरून दोन जणांना अटक केली असून वसीम अहमद आणि अबरार अशी या दोन आरोपींची नावं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



























































