खेळासाठी काय पण!! प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्दी शर्मिलाची राष्ट्रकूल स्पर्धेत धडक

>> आसावरी जोशी 

राष्ट्रकुल स्पर्धेचा थरार आजपासून सुरु होत आहे. प्रत्येक खेळाडू आपल्या देशासाठी.. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी जीवापाड मेहनत घेणार आहे. आपल्या देशातील विविध भागांतून प्रतीकुलतेला मात देत.. संघर्ष करीत.. एका जिद्दीने या खेळाच्या महाकुंभात भाग घेण्यासाठी खेळाडू येतात. अशा स्पर्धांच्या निमित्ताने आपल्या देशातील विविध भागांतील खेळाडूंचे क्रीडा प्राविण्य दिसून येते. कारण अजूनही आपल्याकडील खेळाची मानसिकता क्रिकेटपुरतीच अडकून राहते. गोळा फेक, भालाफेक, लांब उडी, अडथळ्यांची शर्यत, धनुर्विद्या असे अनेक आपल्या मातीतील क्रीडाप्रकार या स्पर्धांच्या निमित्ताने जागतिक व्यासपीठावर येतात.
अशाच हरयाणातील गोळाफेकपटूच्या जिद्दीची ही गोष्ट. शर्मिला. अपंग खेळाडूंच्या श्रेणीत शर्मिलाची निवड झाली आहे. आपल्या देशासाठी पदक जिंकून आणण्याचे स्वप्न ती पाहत आहे.
तिचा नवरा तिला सतत मारहाण करायचा. खरेतर तिचा संघर्ष लहानपणापासूनच सुरु झाला. आई आंधळी. तीन बहिणी, एक भाऊ. शर्मिलाव्यतिरिक्त घरात सर्वजण अव्यंग. शर्मिलाला दोन तीन वर्षांची असताना पोलिओ झाला. आणि डाव्या पायात कायमचे व्यंग राहिले. पंधराव्या वर्षीच तिचे लग्न लावून दिले. सासरी गेल्यावर खरी परिस्थिती समोर आली. नवरा प्रचंड दारू प्यायचा. त्याच्या हातची बेदम मारहाण शर्मिलाच्या नशिबी आली होती. दोन मुलींच्या जन्मानंतरही आहे त्या परिस्थितीत काही फरक पडला नव्हता. एकदा तर नवऱ्याने मांडीवरच्या मुलीचाच जीव घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शर्मिलाला माहेरची माणसे घरी घेऊन गेली. ६ वर्षांनी घरातील माणसांनी तिचे दुसरे लग्न लावून दिले. सुरुवातीला शर्मिला खूप घाबरली होती. पण दुसऱ्या नवऱ्याची वर्तणूक पाहून तिला त्याच्याबद्दल विश्वास वाटू लागला. दुसऱ्या नवर्याने तिच्या दोन्ही मुलीना दत्तक घेतले. शर्मिलाला खेळाकडे वळवले. मुलीना खेळत भाग घेण्याची प्रेरणा दिली. गोळाफेक या खेळत शर्मिलाला रस होता. तिचे प्रशिक्षक टेकचंद तिचे दूरचे भाऊ. त्यांनी तिला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
वर्षभरातच शर्मिलाने राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवले. पुढे राष्ट्रीय शिबिरात तिची निवड झाली. आता राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवड होण्यामागे नवऱ्याचे
प्रोत्साहन आणि प्रशिक्षकांची प्रेरणा आहे. शर्मिलाच्या दोन्ही मुली खेळत आहेत. मोठी भालाफेक करते तर धाकटी बडमिंटन खेळते. तिघीही जणी आपापल्या सरावाला जातात. त्यासाठी शर्मिलाचे पती तिला पूर्ण पाठींबा देतात. घरकामासाठी त्यांनी सहायक ठेवले आहेत. तिच्या अपंग असण्याची जाणीव तर तिला कधी दिली नाहीच. पण त्यावर मात करून कसे पुढे जायचे हे शिकवले. आता गोळाफेकीत शर्मिलाला बर्मिंगहॅममध्ये तिरंगा रोवायचा आहे.